टक्केवारीमुळे बिघडले विकासकामांचे गणित

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 एप्रिल 2018

पुणे - प्रभागांमध्ये वर्षभरापूर्वी आखलेली कोट्यवधींची कामे फेब्रुवारी, मार्चमध्ये हाती घेऊन त्याचा निधी खर्ची पाडण्याचा आटापिटा नगरसेवक करीत आहेत. नगरसेवक, अधिकारी आणि ठेकेदार यांच्या ‘टक्केवारी’च्या बेरजेमुळे विकासकामांचे गणित बिघडत असल्याचे दिसून येत आहे. या कामांसाठी ठराविक मुदत असली, तरी ती घाईगडबडीत आटोपून त्याची बिले काढण्याचा सपाटा नगरसेवकांनी लावला आहे.

शहरभरात सध्या सहयादीतून दोनशे कोटी रुपयांची कामे होत असल्याचे महापालिका प्रशासनाचे निरीक्षण आहे. ही कामे अर्धवट दाखवून त्यांना मुदतवाढ मिळविण्याची ‘खेळी’ काही नगरसेवक करीत आहेत. या कामांचा दर्जा तपासण्याची यंत्रणा नसल्याने नगरसेवक आणि ठेकेदारांचे ‘उखळ पांढरे’ होत असल्याचे बोलले जात आहे.

महापालिकेच्या अर्थसंकल्पात नगरसेवकांनी आपल्या भागात सुचविलेली कामे सहयादीतून केली जातात. अर्थसंकल्पाची मुदत ३१ मार्चपर्यंत असल्याने या कालावधीतच ही कामे संपविणे गरजेचे असते. त्यासाठी ठराविक मुदत दिली जाते. महापालिकेच्या अर्थसंकल्पाची अंमलबजावणी आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यापासून म्हणजे, एप्रिलपासून करणे अपेक्षित असते. उशिराने जागे झालेल्या काही नगरसेवकांनी यंदा जानेवारीपासून कामे सुरू केली आहेत. काही भागांत फेब्रुवारी आणि मार्चमध्येही कामांना प्रारंभ झाला आहे. त्यामुळे बहुतांशी कामे अर्धवट राहिली. त्याचा निधी वाया जाण्याची भीती असल्याने ती आटोपण्याची घाईही या मंडळींनी केली आणि बिले काढली. त्याचा परिणाम कामांच्या दर्जावर झाल्याचे रहिवाशांच्या तक्रारींवरून दिसून आले आहे. महात्मा फुले पेठेतील सांडपाणी वाहिन्यांची कामे आणि हडपसरमधील शिंदे वस्तीतील जलवाहिनीचे काम गरज नसताना केल्याची तक्रार तेथील रहिवाशांनी ‘सकाळ’कडे केली आहे. 

पाणीपुरवठा खात्याशी संबंधित कामांची तपासणी करण्याची यंत्रणा आहे. त्यानुसार पाहणी करूनच बिले दिली जातात. आवश्‍यक त्याच कामांच्या निविदा काढून ती करण्यात येत आहेत. मात्र नागरिकांच्या काही तक्रारी असतील, त्याची खातरजमा केली जाईल.
-व्ही. जी. कुलकर्णी, प्रमुख, पाणीपुरवठा विभाग, महापालिका 

शहराच्या विकासाच्या प्रक्रियेत सहयादीतील कामे महत्त्वाची असतात. मात्र नियोजन नसल्याने अलीकडच्या काळात ही कामे सोयीनुसारच केली जातात. त्यातून हडपसरमधील शिंदे वस्तीतील जलवाहिनीचे काम केले आहे. तेथील जुन्या जलवाहिनी बदलणे गरजेचे नव्हते, तरीही ती बदलली आहे; केवळ निधी खर्च व्हावा, यासाठी हे काम केले आहे. 
-चेतन तुपे, विरोधी पक्षनेते, महापालिका

रस्त्यांची कामे पूर्ण करण्याबाबत ठेकेदारांना सूचना केल्या होत्या. त्यानुसार बहुतांशी भागातील कामे संपली आहेत. मात्र ज्या भागात कामे झाली नाहीत, तेथील ठेकेदारांवर कारवाई केली जाईल. तसेच दर्जा तपासून बिले काढण्यात येतात. ज्या भागातील रस्ते खराब होतील, त्याची दुरुस्ती संबंधित ठेकेदाराकडून पावसाळ्याआधी करून घेण्यात येईल.
-राजेंद्र राऊत, प्रमुख, पथ विभाग, महापालिका

पाणीपुरवठा खात्याशी संबंधित कामांची तपासणी करण्याची यंत्रणा आहे. त्यानुसार पाहणी करूनच बिले दिली जातात. आवश्‍यक त्याच कामांच्या निविदा काढून ती करण्यात येत आहेत. मात्र नागरिकांच्या काही तक्रारी असतील, त्याची खातरजमा केली जाईल.
-व्ही. जी. कुलकर्णी, प्रमुख, पाणीपुरवठा विभाग, महापालिका 

Web Title: Development work due to percentage loss