#DevelopmentIssues पालिकांच्या विकासकामांना खो

Development-Issue
Development-Issue

पुणे - राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या विकासकामांसाठीच्या निधीतून अद्याप जी कामे सुरू झालेली नाहीत अथवा कामांची वर्क ऑर्डर (काम सुरू करण्याचा आदेश) देण्यात आलेली नाही, अशी सर्व कामे थांबविण्याचा आदेश नगरविकास विभागाने राज्यातील सर्व महापालिका व नगरपालिकांना दिला आहे. यामुळे सरकारच्या निधीतून सुरू असलेली विकासकामे रखडणार आहेत.

निधीची उपलब्धता आणि कामांची संख्या यांचा विचार न करता महायुतीच्या काळात मोठ्या प्रमाणावर कामे सुरू करण्यात आली. सरकारने मोठ्या घोषणा देत कामे सुरू केली. मात्र, आता वास्तव दिसू लागले आहे. मागील २० दिवसांपूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागाने ३१ मार्च २०२० पर्यंत कोणत्याही नव्या कामाला वर्क ऑर्डर देण्यात येऊ नये, असा आदेश दिला होता. यापाठोपाठ आता नगरविकास विभागानेही अशाच पद्धतीचे आदेश काढल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महानगरपालिका हद्दीतील विकासकामांना ब्रेक लागणार आहे. 

राज्यातील महानगरपालिका आणि नगरपालिका यांना विकासकामांकरिता विविध योजनांतर्गत विशेष अनुदान सरकारकडून देण्यात येते. महानगरपालिका पायाभूत सुविधा, महानगरपालिका हद्दवाढ, नवीन नगरपालिका, नगरपालिका हद्दवाढ, यात्रास्थळ, महानगरपालिका ठोक तरतूद, आदी शीर्षकाखाली २०१९-२० या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करण्यात आलेला आहे. 

२०१९-२० करिता या योजनांमध्ये शासनाने वितरित केलेल्या निधीपैकी ज्या कामांसाठी वर्कऑर्डर देण्यात आलेली नाही, अशा सर्व कामांची वर्क ऑर्डर देण्याची कार्यवाही पुढील आदेश मिळेपर्यंत स्थगित करण्यात यावी. तसेच, नगरोत्थान प्रकल्पांच्या बाबतीत वर्क ऑर्डर देण्यात आली नसेल अशा कोणत्याही प्रकल्पांची वर्क ऑर्डर पुढील आदेशापर्यंत देण्यात येऊ नये, असा आदेश नगरविकास विभागाचे अवर सचिव विवेक कुंभार यांनी दिला आहे.

राज्य सरकारकडून याबाबत महापालिकेला आदेश प्राप्त झाले आहेत. निवडणुकांपूर्वी राज्य सरकारकडून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत विशेष निधी नगरपालिका आणि महापालिकांना उपलब्ध करून देण्यात आला होता. त्यात पुणे महापालिकेला निधी मिळाला होता, त्यातून कामे सुरू झाली आहेत, त्यामुळे या आदेशाचा फारसा परिणाम होणार नाही.
- सौरभ राव, आयुक्त, महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com