कामे मंदावली; अधिकारी धास्तावले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 मार्च 2019

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यावर सुरू असलेल्या विकासकामांची माहिती दिल्याबद्दल जिल्हा निवडणूक आयोगाकडून गुन्हे दाखल होत असल्यामुळे शासकीय अधिकारी धास्तावले आहेत अन्‌ कामांचाही वेग मंदावला आहे.

पुणे - लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यावर सुरू असलेल्या विकासकामांची माहिती दिल्याबद्दल जिल्हा निवडणूक आयोगाकडून गुन्हे दाखल होत असल्यामुळे शासकीय अधिकारी धास्तावले आहेत अन्‌ कामांचाही वेग मंदावला आहे. त्यामुळे माहिती देण्यास एरवी ‘उत्सुक’ असलेल्या अधिकाऱ्यांना आता आयतेच निमित्त मिळाले आहे.

शहरात सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पाची माहिती दिल्याबद्दल महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांच्यावर नुकताच गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे शहरातील आणि जिल्ह्यातील अधिकारी धास्तावले आहेत. महामेट्रोने तर पत्रकारांना माहिती देण्यासाठीचा व्हॉटस्‌ॲप ग्रुपही बंद केला आहे. शहरात रेल्वे, विमानतळ विस्तारीकरण, नवा विमानतळ, रिंगरोड, उड्डाण पूल आदी विकासकामे तसेच नगर नियोजन, सार्वजनिक बांधकाम आदी विभागांचीही कामे सुरू आहेत. परंतु, लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या नावाखाली या कामांची माहिती अधिकारी नागरिकांनाही देण्यास तयार नाहीत. तसेच कामाचे पुढील टप्पे कसे असतील, याबद्दलही ते बोलण्यास तयार नाहीत. शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातील विकासकामांचा वेग मंदावला आहे.  

३८२ कोटींच्या कामांना खीळ
पिंपरी - महापालिकेची ३८२ कोटी २९ लाख रुपये रकमेची स्थापत्यविषयक विकासकामे खोळंबली आहेत. ही कामे पुढील आर्थिक वर्षातच (२०१९-२०) मार्गी लागू शकतील, अशी परिस्थिती आहे. उड्डाण पूल, रस्ते, काँक्रिट रस्ते, शाळा, रुग्णालय, उद्यान, व्यायामशाळा, समाज मंदिर, स्मशानभूमी, क्रीडांगण आदी विविध विकासकामांचा त्यात समावेश आहे. आचारसंहितेपूर्वी वर्कऑर्डर दिलेली कामेच करता येणार आहेत. निविदा न उघडलेली कामे निवडणुकीनंतर सुरू होतील, असे महापालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.

रेल्वे, पालखी महामार्गाची कामे रखडणार
बारामती - बारामती-फलटण-लोणंद या लोहमार्गाबरोबर संत तुकाराम महाराज पालखी सोहळा महामार्गाचेही काम आचारसंहितेमुळे रखडण्याची चिन्हे आहेत. बारामती ते लोणंद हा लोहमार्ग एकूण ६७ किमी लांबीचा आहे. या मार्गामुळे पुणे स्टेशनवरील बराचसा ताण कमी होणार आहे. त्यासाठी तालुक्‍यातील ४०० एकरसाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी रेल्वेकडून ११५ कोटी रुपये मिळाले असून, केंद्राचा ११० कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. गेल्या वर्षी ऑक्‍टोबरमध्ये सुरू झालेली ही प्रक्रिया आता काही काळ रखडणार आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळा महामार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया बऱ्यापैकी पूर्ण होत आली आहे, उर्वरित भूसंपादनाचे काम रखडणार आहे.

बाह्यवळणाची कामे लांबणार
मंचर - खेड ते सिन्नर चौपदरीकरण रस्त्याची राजगुरुनगर (ता. खेड), मंचर, कळंब, निघोटवाडी, शेवाळवाडी व तांबडेमळा (ता. आंबेगाव) येथील बाह्यवळणाची कामे आचारसंहितेच्या कात्रीत अडकली आहेत. बाह्यवळण रस्त्याच्या कामांचे प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आले आहेत. आचारसंहिता संपल्यानंतरच मंजुरी मिळून कामे सुरू होतील. आंबेगाव तालुक्‍यात जवळपास ५० ग्रामपंचायतींचा प्रशिक्षण कार्यक्रम सध्या थांबला आहे.

सुरू असलेल्या विकासकामांची माहिती देण्यास हरकत नाही
सुरू असलेल्या विकासकामांची माहिती देण्यास काहीही हरकत नाही. आचारसंहितेमुळे नवे प्रकल्प सुरू होणार नाहीत. मात्र, त्या पूर्वीच सुरू असलेल्या विकासकामांची माहिती देऊन त्याची प्रक्रिया नेहमीप्रमाणे सुरू ठेवायची आहे, याची अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.

Web Title: development work slow loksabha election code of conduct officer