विकासकामांमुळे उपनगरे होताहेत स्मार्ट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

पिंपरी - शहराचा स्मार्ट सिटीत झालेला समावेश आणि पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) पुणे, पिंपरी-चिंचवडसह केलेला सर्वंकष वाहतूक आराखडा यामुळे शहरात विकासकामे करण्यासाठी महापालिकेला एक नवीन दिशा मिळाली आहे. त्यानुसार चऱ्होली, मोशी, डुडुळगाव, ताथवडे, पुनावळे, किवळे, रावते, मामुर्डी या उपनगरांमधील विकासकामे सुरू आहेत. त्यामुळे उपनगरेही आता स्मार्ट होऊ लागली आहेत. 

पिंपरी - शहराचा स्मार्ट सिटीत झालेला समावेश आणि पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) पुणे, पिंपरी-चिंचवडसह केलेला सर्वंकष वाहतूक आराखडा यामुळे शहरात विकासकामे करण्यासाठी महापालिकेला एक नवीन दिशा मिळाली आहे. त्यानुसार चऱ्होली, मोशी, डुडुळगाव, ताथवडे, पुनावळे, किवळे, रावते, मामुर्डी या उपनगरांमधील विकासकामे सुरू आहेत. त्यामुळे उपनगरेही आता स्मार्ट होऊ लागली आहेत. 

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत शहराचा समावेश झालेला आहे. त्यांच्या नियोजनानुसार पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर व वाकड परिसरात विकासकामे सुरू आहेत. त्यात रस्त्यांची उभारणी, पदपथ, सायकल ट्रॅक, उद्याने, वाहतूक सुविधा, पथदिवे, भूमिगत सेवा वाहिन्या आदी बाबींचा समावेश आहे. त्याला पीएमआरडीएने केलेल्या सर्वंकष वाहतूक आराखड्याची जोड मिळाली आहे. या आराखड्यात पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह पीएमआरडीए क्षेत्रातील सर्व गावांसाठीच्या पुढील २० वर्षांच्या वाहतूक व्यवस्थेचा विचार केला आहे. त्यानुसार विकासकामे सुरू झाली आहेत. याच पद्धतीने उपनगरातील रस्त्यांची उभारणी व अन्य विकासकामे सुरू आहेत. साध्या पथदिव्यांऐवजी वीजबचतीसाठी एलईडी दिवे बसविले जात आहेत. 

ताथवडेच्या विकास आराखड्यास राज्य सरकारने दोन महिन्यांपूर्वी मंजुरी दिली. त्यानुसार आरक्षणांचा विकास केला जात असून, रस्ते व अन्य कामे सुरू आहेत. रावेत, पुनावळे, किवळे या भागाचाही कायापालट सुरू आहे. महापालिकेच्या तळवडे हद्दीपासून चऱ्होलीतील हद्दीपर्यंत इंद्रायणी नदीलगत प्रशस्त डीपी रस्ता मंजूर आहे. चिखली ते मोशीदरम्यान त्याचे काम प्रगतिपथावर आहे. डुडुळगाव येथे इंद्रायणी नदीवर उभारलेल्या पुलास जोडणाऱ्या रस्त्याचे कामही सुरू आहे. चऱ्होली फाटा ते चऱ्होली गाव, दाभाडे वस्तीतील ४५ मीटर रस्ता, काळजेवाडी-ताजने मळा मार्गे चऱ्होली आणि चऱ्होली ते लोहगाव यांना जोडणाऱ्या रस्त्याची कामेही सुरू आहेत. 

पिंपळे निलखला महत्त्व
पुणे-नाशिक महामार्ग, पुणे-मुंबई महामार्ग, पिंपरी कॅम्प, सांगवी-औंध भागातून हिंजवडीला जाण्यासाठी पिंपळे निलख येथून जावे लागते. शिवाय हा भाग स्मार्ट सिटीत समावेश झालेल्या पिंपळे सौदागर भागाला लागून आहे. त्यामुळे पिंपळे निलख भागालाही स्मार्ट करण्यासाठी तेथील विकासकामांना प्राधान्य दिले जात आहे. त्याअंतर्गत औंध-रावेत रस्त्यावरील वाय जंक्‍शन ते विशालनगर-वाघजाई चौक, बाबू कामठे चौक ते स्मशान भूमी रस्ता, बाबू कामठे चौक ते मिताली गार्डन या रस्त्यांवर स्मार्ट सिटी प्रकल्पाप्रमाणे प्रकाश व्यवस्था केली जाणार आहे. याबाबतचा निर्णय महापालिका विधी समितीने घेतला आहे.

स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर परिसरात पथदर्शी प्रकल्प राबविला जात आहे. त्यात शहराच्या अन्य भागांचा समावेश नंतर केला जाणार आहे. चऱ्होली, ताथवडेसारख्या उपनगरातील कामे स्मार्ट सिटीच्या तत्त्वांनुसारच सुरू आहेत.
- श्रावण हर्डीकर, आयुक्त, महापालिका

आमच्या भागात अद्यापही मोठ्या प्रमाणात शेती केली जात आहे. नवीन रस्त्यांमुळे या भागाचा कायापालट होणार आहे. मात्र, रस्ते व अन्य विकासकामांसाठी जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला लवकर मिळाला पाहिजे. 
- सचिन पवार, शेतकरी, डुडुळगाव

Web Title: Development Work Suburb Smart