
Kasba By Election Result : पोटनिवडणुकीतील पराभवानंतर देवेंद्र फडणवीसांची 'पुन्हा' घोषणा! म्हणाले...
पुण्यात कसबा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजयी झाले आहेत. कसबा मतदारसंघातून धंगेकर यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्यावर मात केली. बालेकिल्ल्यात पराभव झाल्यामुळे भाजपवर टीका होत आहे. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही पुन्हा येऊ इशारा दिला आहे.
"कसब्यातील जनतेचे सुद्धा मनापासून आभार. जनतेने आम्हाला आशीर्वाद दिलेत. थोडे कमी आशीर्वाद मिळाले असले तरी त्यांनी दिलेल्या जनादेशाचा स्वीकार करतो. पण, एक नक्की सांगतो, आपले आशीर्वाद मागण्यासाठी ‘आम्ही पुन्हा येऊ’!," असे देवेंद्र फडणवीस ट्विट करत म्हणाले आहेत.
काँग्रेसच्या धंगेकरांनी भाजपचा गड जिंकला -
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांना १० हजार ९५० मतांनी धूळ चारली. धंगेकर यांना ७३ हजार १९४, तर रासने यांना ६२ हजार २४४ मते मिळाली. भाजपने प्रतिष्ठेची केलेल्या या निवडणुकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी पुण्यात मुक्काम ठोकूनदेखील त्यांना धंगेकरांचा अश्वमेध रोखता आला नाही. सदाशिव पेठ, नारायण पेठ, शनिवार पेठेनेदेखील धंगेकरांच्या पारड्यात भरभरून मतदान करून विजय सोपा केला.
आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत जाहीर भाजपने टिळक कुटुंबाऐवजी सलग चार वेळा पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष राहिलेले रासने यांना उमेदवारी जाहीर केली, तर काँग्रेसकडून धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली. महाविकास आघाडीचे सर्वच नेते प्रचारात उतरले. त्यांनी मेळावे, सभा, रोड शो घेतले.
भाजपच्या धोरणांवर टीका केली, तर भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मैदानात उतरवले होते. त्यासह अर्धा डझनमंत्री व इतर प्रदेश पातळीवरच्या नेत्यांनी प्रचार केला. शेवटच्या टप्प्यात ही निवडणूक अटीतटीची होण्याची शक्यता निर्माण झाली. त्यामुळे नेमका विजय कोणाचा होणार, याची उत्सुकता निर्माण झाली होती.