धनगर समाजाचे जिल्ह्यात आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

भिगवण - धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करून त्याची तत्काळ अंमलबजावणी व्हावी, या मागणीसाठी भिगवण परिसरातील धनगर समाजाच्या वतीने येथील मदनवाडी चौफुला (ता. इंदापूर) येथे आंदोलन करण्यात आले. आरक्षणाच्या मागणीसाठी बंदचा मार्ग न स्वीकारता समाजाची भूमिका सनदशीर मार्गाने निवेदनाच्या माध्यमातून सरकारपर्यंत पोचविण्यात आली. बंद न करण्याच्या धनगर समाजाच्या भूमिकेचे ग्रामस्थांनी स्वागत केले.        

भिगवण - धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करून त्याची तत्काळ अंमलबजावणी व्हावी, या मागणीसाठी भिगवण परिसरातील धनगर समाजाच्या वतीने येथील मदनवाडी चौफुला (ता. इंदापूर) येथे आंदोलन करण्यात आले. आरक्षणाच्या मागणीसाठी बंदचा मार्ग न स्वीकारता समाजाची भूमिका सनदशीर मार्गाने निवेदनाच्या माध्यमातून सरकारपर्यंत पोचविण्यात आली. बंद न करण्याच्या धनगर समाजाच्या भूमिकेचे ग्रामस्थांनी स्वागत केले.        
आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज बांधवांनी एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली. या वेळी जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, धनाजी थोरात, संपत बंडगर, आबासाहेब बंडगर, संजय देवकाते, सतीश शिंगाडे, अरविंद देवकाते, अमित देवकाते, डॉ. तुळशीराम खारतोडे, कुंडलिक बंडगर, जिजाराम पोंदकुले, तेजस देवकाते, अण्णा धवडे, अतुल देवकाते, सुरेश बिबे व धनगर समाजातील तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

मेंढपाळांना गायरान राखीव ठेवा
धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा, सोलापूर विद्यापीठास पुण्यश्‍लोक अहल्यादेवी होळकर यांचे नाव द्यावे, आरक्षणासाठी आत्महत्या केलेले परमेश्वर घोंगडे यांच्या कुटुंबास २५ लाखांची आर्थिक मदत करावी, समाजातील विद्यार्थ्यांची थकीत शिष्यवृत्ती तत्काळ द्यावी, मेंढपाळांना गायरान राखीव ठेवाव्यात आदी मागण्या करण्यात आल्या. समाजाच्या मागण्यांचे निवेदन भिगवणचे सहायक पोलिस निरीक्षक निळकंठ राठोड यांना देण्यात आले. 

धनगर आरक्षणासाठी राहू बेट परिसरात ‘बंद’
राहू - धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीसाठी राहू बेट (ता. दौंड) परिसरात आज बंद पाळण्यात आला. दरम्यान, आरक्षणाच्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या मोर्चाचे राहू येथील मुख्य चौकात सभेत रूपांतर झाले. या वेळी ज्येष्ठ नेते तात्यासाहेब टेळे म्हणाले, ‘‘आतापर्यंतच्या सत्ताधाऱ्यांनी धनगर समाजाचा फक्त मतांसाठी वापर करून घेतला.

धनगर आणि धनगड ही एकच जात आहे. हे सरकारला कधी कळणार. सरकार मात्र समाजाची फसवणूक करत आहे.’’ ‘‘आरक्षणासाठी गटतट आणि पक्षीय राजकारण सोडून समाजाने एकत्रित यावे,’’ असे आवाहन बाळासाहेब गरदरे यांनी केले. ‘‘पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ म्हणणाऱ्या भाजप सरकारला आगामी निवडणुकीत त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय आम्ही आता शांत बसणार नाही,’’ असे माजी सरपंच दत्तोबा डुबे यांनी सांगितले. प्रा. दत्तात्रेय डुबे यांनी धनगर समाजाच्या आरक्षण आणि न्यायालयीन प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती दिली. सागर डुबे म्हणाले, की धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये जो आरक्षण देईल. त्यांच्याच पाठीशी यापुढे हा समाज उभा राहणार आहे. कित्येक वर्षांपासून धनगर समाजाची थट्टा चालवली आहे. या वेळी बाळासाहेब कारंडे, सुधीर डुबे, योगेश डुबे, पांडुरंग टेंगले, दादा टेळे, शिवाजी टेंगले, चांगदेव मदने, राजेंद्र डुबे, संजय टेळे, गणपत डुबे, अभी कोकरे यांच्यासह धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

केडगाव येथे कडकडीत बंद
केडगाव - धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी केडगाव (ता. दौंड) परिसरात पुकारलेला बंद शांततेत पार पडला. बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. केडगाव, बोरीपार्धी, वाखारी, दापोडी, खोपोडी, देऊळगावगाडा या गावांमध्ये दुपारपर्यंत कडकडीत बंद पाळण्यात आला. केडगाव परिसरातील युवक कार्यकर्त्यांनी रविवारी बंदच्या संदर्भात बैठक घेतली होती. या बैठकीत शांततेत बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले होते. सकाळी परिसरातील युवकांनी भंडारा उधळत दुचाकीवरून रॅली काढली. या वेळी सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. रॅलीतील युवकांनी केडगाव ग्रामपंचायत कार्यालयापुढे व चौफुला येथील उड्डाण पुलावर सभा घेऊन आरक्षणाबाबतची भूमिका विशद करण्यात आली. धनगर समाज वेगळे आरक्षण मागतच नाही. समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समावेश केलेला आहे. फक्त त्याची अंमलबजावणी करणे बाकी आहे. यासाठी भाजप-शिवसेनेसह या आधीच्या सर्वच सरकारांनी यात समाजाला खेळवत ठेवले आहे. असा मुद्दा युवकांनी आपापल्या भाषणात मांडला. भीमा पाटस कारखान्याचे माजी उपाध्यक्ष आनंद थोरात यांनी पोलिस निरीक्षक सूरज बंडगर यांना निवेदन दिले. या वेळी परिसरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Web Title: Dhangar Society Agitation for Reservation