विधानपरिषदेसाठी मोहिते-पाटील इच्छुक; राष्ट्रवादी तिकीट देणार?

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 9 August 2020

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने दिलेल्या उमेदवाराचा आपण प्रामाणिकपणे प्रचार केला. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेला आदेश आम्ही शिरसावंद्य मानून काम केले.

इंदापूर (पुणे) : आपण कृषी, आरोग्य, शिक्षण, रक्तदान, रोजगार निर्मिती, सामाजिक, सांस्कृतिक तसेच राजकिय क्षेत्रात सर्वसामान्य माणूस विकासाचा केंद्रबिंदू मानून काम करत आहोत आणि त्यामागे वडील माजी खासदार कै. प्रतापसिंह मोहिते-पाटील यांची प्रेरणा आहे. माझे दापोली येथील कृषी विद्यापीठात एम.एस्सी. अॅग्री (पी.एच.डी जेनेटिक्स अँड प्लॅन्ट ब्रीडिंग ) इथपर्यंत शिक्षण झाले आहे.

देशाची अर्थव्यवस्था शेती आणि शेतीपूरक व्यवसायावर अवलंबून असल्याने शेतकऱ्यांना मला आर्थिक न्याय द्यायचा आहे. त्यामुळे आपण राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्य म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस कोट्यातून इच्छुक आहोत, त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी आपला प्राधान्याने विचार करावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य साखर संघाचे माजी सदस्य धवलसिंह मोहिते पाटील यांनी केले.

ढोबळी मिरचीच्या तीनच तोड्यात शेतकरी दाम्पत्याने कमावले सव्वा लाख​

Image may contain: 1 person, standing and outdoor

मोहिते-पाटील पुढे म्हणाले, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने दिलेल्या उमेदवाराचा आपण प्रामाणिकपणे
प्रचार केला. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेला आदेश आम्ही शिरसावंद्य मानून काम केले. त्यामुळे पक्षाने आता माझ्यासारख्या उच्चविद्याविभूषित आणि कर्तबगार उमेदवारास संधी देणे गरजेचे आहे. कृषी विद्यार्थी जीवनात आपण चार वेळा जनरल सेक्रेटरी, जनसेवा विद्यार्थी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, सोलापूर जिल्हा कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष, महाराष्ट्र रेसलिंग फेडरेशनचे उपाध्यक्ष, ऑनररी श्री प्रतापसिंह मोहिते पाटील ट्रस्ट तसेच धवलसिंह मोहिते पाटील युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष म्हणून लक्षवेधी काम केले आहे.

कर्मचाऱ्यांसाठी कोरोना विमा संरक्षण; शिरुर बाजार समिती ठरली राज्यात पहिली!​

दरवर्षी किमान ८० हजार ते १ लाख शेतकऱ्यांचा मेळावा घेऊन त्यांना मार्गदर्शन केले जाते. दरवर्षी युवकांसाठी कबड्डी स्पर्धा घेऊन त्यांचे सबलीकरण केले जाते. दुष्काळप्रवण क्षेत्रात आतापर्यंत कोल्हापूर पद्धतीचे २२ बंधारे बांधले आहेत. शंकरराव मोहिते पाटील इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, को-ऑपरेटिव्ह बँक, श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, सहकार महर्षी मोहिते पाटील ट्रस्ट, स्वामी सर्वादानंद रोग निदान केंद्राचे संचालक, जिल्हा परिषद सदस्य तसेच विविध शैक्षणिक संस्थांचे संचालक म्हणून आपण आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे, अनेकांना सहकार्य केले आहे.

दारु पिऊन एटीएममध्ये घुसला, सीसीटीव्हीला चिखल लावला अन्...​

कोरोना संचारबंदी आणि अनलॉकमध्ये हातावर पोट असणाऱ्या हजारो कामगारांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. तसेच पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कर्नाटक ,आंध्रप्रदेश येथे चालत चाललेल्या हजारो कामगारांना टेंभुर्णी येथे निवारा आणि जेवण देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सक्रिय सदस्य म्हणून आपण पक्षसंघटन मजबूत करण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. पक्षाचे युवकांना पाठबळ देण्याचे धोरण असल्याने आपले योगदान लक्षात घेऊन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मला जनसेवेची संधी द्यावी, अशी विनंती त्यांनी केली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dhavalsinh mohite patil interested for Legislative Council from NCP quota