धायरीत रोज दोनशे टॅंकरमधून पाणी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मे 2019

बेकायदा नळजोड तोडणार
या आधी धायरीचा काही भाग महापालिकेत असल्याने तिथे महापलिकेच्या जलवाहिन्या आहेत. मात्र, काही लोकांनी बेकायदा नळजोड घेतल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे पाहणी करून बेकायदा नळजोड तोडण्याची सूचना महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी पाणीपुरवठा खात्याला केली आहे. त्यामुळे ग्रामस्थांना दिलासा मिळणार आहे.

पुणे - धायरीतील पाण्याची समस्या कायमस्वरूपी सोडवून ग्रामस्थांना पुरेसे पाणी देण्यासाठी महापालिकेने आणखी पावले उचलली आहेत. या भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी नव्या दोनसह चार टॅंकर पॉइंट सुरू करण्यात येणार आहेत, त्यामुळे रहिवाशांना रोज दोनशे टॅंकरमधून पाणीपुरवठा होईल. तसेच, गावातील पाच लाख लिटर क्षमतेच्या टाकीची आवश्‍यक ती कामे करून पाण्याची साठवण क्षमता वाढविली जाणार आहे. या उपाययोजनेनंतर ग्रामस्थांना खासगी टॅंकरचालकांकडून पाणी घेण्याची गरज नसेल, असे महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितले. धायरीकरांना हक्काचे पाणी मिळावे, याकडे ‘सकाळ’ने लक्ष वेधले होते. 

कालव्यातून पाण्याची चोरी करून, धायरीकरांना ते चढ्या भावाने विकत असल्याचे ‘सकाळ’ने उघडकीस आणले, तसेच याबाबत पाठपुरावाही केला. त्यानंतर पाणी चोरणाऱ्यांविरोधात कारवाई झाली. या पार्श्‍वभूमीवर येथील खासगी पाणीपुरवठादारांनी (टॅंकर पाँइंट मालक) पाणी पुरविणे बंद केल्याने काही दिवसांपासून येथील रहिवाशांचे पाण्याअभावी हाल होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर टिळक यांच्यासह नगरसेवक, महापालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांची भेट घेऊन, समस्या जाणून घेतली. गामस्थांना गरजेइतके पाणी देण्यासाठी टॅंकर पॉइंटची संख्या वाढविणार असल्याचे महापौरांनी सांगितले. त्या म्हणाल्या, ‘‘कालव्यातून पाणीचोरी केली जात होती. त्यानुसार कारवाई झाल्याने हे प्रकार बंद आहेत. येथील रहिवाशांना पाणी पुरविण्यात येईल.’’

पाणीचोरांवर गुन्हे दाखल करा
कारवाईनंतर पाणीपुरवठादारांनी पाणीचोरी सुरू केल्याच्या तक्रारी आहेत. ही चोरी रोखण्यासाठी पाटबंधारे खात्याने कठोर पावले उचलावीत. ज्यामुळे लोकांना पुरेसे पाणी मिळण्यास मदत होईल. पाण्याची चोरी करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करावेत, असा सल्ला महापौर टिळक यांनी पाटबंधारे खात्याला दिला.

‘दोषींवर कारवाई करा’
धायरी येथील पाणी आणि वीजचोरी प्रकरणात संबंधित खात्याने तातडीने चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. ही गळती थांबविण्याची कार्यवाहीही तातडीने करावी, अशी सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी महावितरण आणि पाटबंधारे खात्याला दिली आहे.

पालकमंत्र्यांनी आदेश देऊनही पाटबंधारे खाते मात्र अद्याप संबंधित विहीर आणि पॉइंट मालकांवर कारवाई करण्यास तयार नसल्याचे समोर आले आहे.
धायरी येथे कालव्याला भगदाड पाडून विहिरीत आणि विहिरीतून टॅंकरमध्ये पाणीचोरी केली जात असल्याचे प्रकरण ‘सकाळ’ने उघडकीस आणले होते. त्यासाठी वीजचोरी देखील होत असल्याचे निदर्शनास आले होते. दरम्यान या संदर्भातील बातम्यांची दखल घेऊन बापट यांनी देखील या सर्व प्रकरणांची माहिती घेतली. 

यासंदर्भात बापट म्हणाले, ‘पाणीटंचाईची परिस्थिती असताना अशा प्रकारे पाणीचोरी होत असेल, तर ती गंभीर बाब आहे. त्यामुळे कोणाचीही गय करण्यात येणार नाही. पाटबंधारे खात्याने या पाणीचोरीविरोधात कडक कारवाई करणे अपेक्षित आहे. तशा सूचनाही त्यांना देण्यात आल्या आहे. तसेच महावितरणच्या अधिकाऱ्यांना देखील सांगण्यात आले आहे. यामध्ये जे जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, यासाठी मी स्वत: आग्रही आहे.’’

महापालिका कर्मचाऱ्यांचा देखील सहभाग
पॉइंट आणि टॅंकरमालक यांचा व्यवसाय सुरू राहावा, यासाठी महापालिकेचे कर्मचारीदेखील हातभार लावत असल्याची माहिती समोर आली आहे. या भागात पाण्याचे व्हॉल्व्ह सोडताना मुद्दाम काही भागाला कमी पाणी कसे मिळेल, आणि टॅंकरचा धंदा कसा वाढेल, असे पाहिले जात आहे. एक प्रकारे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करण्याचे उद्योग या ठिकाणी सुरू झाले आहेत. त्यासाठी महापालिकेच्या जल वाहिनीवरील चावीवाल्यांना हाती धरण्यात आले असल्याचे ‘सकाळ’च्या एका जागरूक वाचकाने निदर्शनास आणून दिले.

महावितरणमध्ये राजकारण 
पाणी आणि वीजचोरी प्रकरणावरून धायरी येथील महावितरणच्या कार्यालयात राजकारण सुरू झाले आहे. तेथील सहायक अभियंता हे पद रिक्त आहे. त्या पदाचा अतिरिक्त कार्यभार दुसऱ्या अधिकाऱ्याकडे देण्यात आला आहे. ते पद आपल्याला मिळावे, यासाठी अधिकाऱ्यांमध्ये चढाओढ सुरू झाली असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. त्यासाठी तेथील कार्यालयामधील फलकावर थेट अधिकाऱ्यांच्या नावाने निनावी पत्रके लावण्यात आली आले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhayari Water Shortage Water Tanker