अखेर धायरीला टँकरद्वारे पाणीपुरवठा

Water-Tanker
Water-Tanker

सिंहगड रस्ता  - महापालिकेने मंगळवार सकाळपासून टॅंकर सोडत धायरीला पाणीपुरवठा सुरू केला. मात्र अजूनही पुरेसे पाणी मिळत नसल्याची रहिवाशांची तक्रार आहे. दरम्यान, पाणीपुरवठा वाढविण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

धायरीतील पाणी प्रश्‍नाबाबत ‘सकाळ’ने आवाज उठविल्यानंतर महापालिकेची यंत्रणा खडबडून जागी झाली. मंगळवारी सकाळी दहापासून महापालिकेने धायरीसाठी टॅंकर सुरू केले. 

सध्या पर्वती येथील पॉइंटला टॅंकर भरून धायरीत आणण्यात येत आहेत. वाहतूक आणि अंतर यामुळे टॅंकर आणण्यात वेळ जात असल्याने धायरीत नवीन पॉइंट सुरू करण्यासाठी महापालिकेच्या वतीने आज सर्व्हे करण्यात आला. अधीक्षक अभियंता प्रवीण गेडाम, कार्यकारी अभियंता आशिष जाधव, उपअभियंता सुनील अहिरे, कनिष्ठ अभियंता व्यंकटेश पाटील यांनी पॉइंटची पाहणी केली. 

धायरी फाटा येथील सणस शाळेजवळील पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयाजवळ पॉइंट काढण्यात येणार आहे. त्यासाठी पुढील कार्यवाही केली असल्याचे उपअभियंता अहिरे यांनी सांगितले.

महापालिकेने पुरेसे टॅंकर द्यावेत. काही करा पण पाणी द्या; आम्ही त्यासाठी पैसे मोजायला तयार आहोत. घरातील सगळी कामे ठप्प झाली आहेत. पाणीच नाही तर करायचे काय, असा प्रश्‍न आहे. चार-चार दिवस आंघोळीलाही पाणी मिळणासे झाले आहे. 
- बाळू हिंगमिरे, सिद्धिविनायक दर्शन सोसायटी, रायकरमळा

महापालिकेने पुरेसा पाणीपुरवठा केला तर आम्हाला टॅंकरची गरज पडणार नाही. आम्हाला या सगळ्या परिस्थितीतून बाहेर काढण्याची जबाबदारी महापालिका, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींची आहे. नागरिकांना किमान जीवनावश्‍यक सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. 
- अनुराधा दिनकर, शिवालय, रायकरमळा

नागरिकांकडून कर वसूल केला जातो. त्यातूनच पाण्याच्या टाक्‍या उभ्या राहतात; पण त्याचा उपयोग मात्र नागरिकांना करता येत नाही. वेळोवेळी पाठपुरावा करूनही पाण्याची टाकी सुरू केली नाही. त्यामुळे पाणी विकत घेण्याची वेळ येत आहे. नागरिकांच्या असहायतेचा फायदा घेऊ नका. 
- माधुरी याळगी, जाधव हाईट्‌स, रायकरमळा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com