ढोल बजने लगा है... 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 जुलै 2018

दिवसाला वीस-पंचवीस पाने शिवून हजार रुपयांपर्यंतही रोजगार मिळतो. पानाचा वास हाताला लागू नये म्हणून कारखान्यातूनच स्वच्छ व टिकाऊ चामडे खरेदी केले जाते. हे कष्टाचे काम असले तरीही उत्सवाच्या ओढीने शारीरिक थकवा निघून जातो. 

- रामभाऊ ढेबे, ढोल-ताशा कारागीर.

पुणे : गणेशोत्सव सव्वा महिन्यावर येऊन ठेपला आहे. या पार्श्‍वभूमीवर ढोल-ताशांसाठी चामड्याची पाने तयार करण्याच्या कामाला सध्या वेग आला आहे. वस्तू आणि सेवाकराची (जीएसटी) भीती मनातून गेल्याने या व्यावसायिकांमध्ये सध्या उत्साहाचे वातावरण आहे. नळदुर्ग, लातूर येथून मागविलेल्या बकरी आणि बोकडाच्या चामड्यांने ढोलाची पाने तयार करण्याच्या कामास कारागीर व्यग्र आहेत. 

गणेशोत्सवासाठी शहरात विविध ढोल-ताशा पथकांनी आता सराव सुरू केला आहे. यामुळे या वाद्यांचा आवाज ऐकू येऊ लागला आहे. यानिमित्ताने दरवर्षी ढोल-ताशा विक्रीच्या व्यवसायातून सुमारे पन्नास लाख रुपयांहून अधिक उलाढाल होते. गणेशोत्सव जसा जवळ येईल, तसतशी या व्यवसायातील उलाढाल वाढेल, असा विश्‍वास विक्रेत्यांनी व्यक्त केला. पथकांच्या मागणीनुसार 18, 24, 26, 28, 30, 33 इंचाचे ढोल तयार करण्यात येत आहेत. तसेच 28 इंची ढोलाच्या पानांना सर्वाधिक मागणी असते. पूर्वी म्हैस व रेडाच्या चामड्यांपासून ढोल तयार करण्यात येत; पण त्याचा आवाज मर्यादित होता. त्यामुळे बकरी व बोकडाच्या चामड्यांपासून बनविलेल्या ढोलांची पथकांकडून सध्या मागणी होत असते. 

या व्यवसायासाठी जालना, परभणी व नांदेड येथून चामडे मागविण्यात येते. मात्र, वाहतूक खर्च परवडत नसल्याने नळदुर्ग व लातूर येथील चामड्याची सध्या आवक अधिक होत आहे. यंदा एका ढोलांची किंमत 1800 रुपयांपासून 2800 रुपयांपर्यंत, तर ताशा 1400 रुपयांपासून ते 4500 रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. पथकाकडून ढोलाची पाने बदलण्याचे कामेही या कारागिरांकडून सध्या करून घेतले जात आहे. 

असा घुमतो ढोलाचा आवाज 

चामड्याच्या पानावर दोरीने शिलाई केली जाते. त्यानंतर ते पान दोन दिवस वाळविल्यावर त्याच्या मध्यभागी तेल मिश्रित मेण लावले जाते. ते सुकल्यावर त्यावर टिपराने ठेका धरताच ढोलाचा घुमणारा आवाज ऐकायला येतो.

ताशाला तांबे, पितळ किंवा स्टीलचाही सांगडा येतो. त्यावर फायबरचे तयार पान बसविले जाते, असे ढोल-ताशा विक्रेते विजय नाईक यांनी सांगितले. ढोलाची पाने हाताने शिवावी लागतात. शिवणकाम झाल्यावर पानावरचे अतिरिक्त चामडे काढून टाकले जाते. पंधरा मिनिटांत एक पान शिवून होते, असे कारागीर सादिक अन्सारी यांनी सांगितले.

Web Title: Dhol Pathak for Ganesh Festival