‘ससून’ही घेणार मधुमेहींची काळजी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जानेवारी 2017

रक्तातील इन्शुलिन आणि ‘व्हिटॅमिन डी ३’ची होणार तपासणी 
पुणे - मधुमेह तपासणीसाठी अत्यावश्‍यक असलेली रक्तातील इन्शुलिन आणि हाडांच्या ठिसूळतेसाठी आवश्‍यक ‘व्हिटॅमिन डी ३’ची वैद्यकीय चाचणी करणारे ससून हे राज्यातील पहिले सरकारी रुग्णालय ठरले आहे. आता तातडीने रोगनिदान करून रुग्णावर योग्य उपचार करणे शक्‍य होणार आहे.

रक्तातील इन्शुलिन आणि ‘व्हिटॅमिन डी ३’ची होणार तपासणी 
पुणे - मधुमेह तपासणीसाठी अत्यावश्‍यक असलेली रक्तातील इन्शुलिन आणि हाडांच्या ठिसूळतेसाठी आवश्‍यक ‘व्हिटॅमिन डी ३’ची वैद्यकीय चाचणी करणारे ससून हे राज्यातील पहिले सरकारी रुग्णालय ठरले आहे. आता तातडीने रोगनिदान करून रुग्णावर योग्य उपचार करणे शक्‍य होणार आहे.

ससून रुग्णालयातील रक्तनमुने तपासण्यासाठी यापूर्वी बाहेर पाठवले जात होते. गेल्या काही महिन्यांपासून ही यंत्रणा सक्षम करण्यासाठी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे सर्व अत्यावश्‍यक रक्तचाचण्या ससून रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत करणे आता शक्‍य झाले आहे. रुग्णांची गरज आणि अद्ययावत रोगनिदान तंत्र विकसित करण्याच्या उद्देशाने इन्शुलिन आणि व्हिटॅमिन डी ३ या चाचण्या सुरू केल्याची माहिती बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी दिली.

डॉ. अभय जगताप म्हणाले, ‘‘ससून रुग्णालयात गेल्या तीन महिन्यांपासून या अद्ययावत वैद्यकीय चाचण्या करण्यात येत आहेत. इन्शुलिन मेटाबॉलिक सिंड्रोम यातून तपासता येतात. तसेच, आधुनिक जीवनशैलीमुळे महिलांमध्ये हाडांची ठिसूळता मोठ्या प्रमाणात दिसून येते. त्याचे अचूक निदान करून योग्य उपचारासाठी या वैद्यकीय चाचण्या महत्त्वाच्या ठरतात. पॅरा थायरॉईड हार्मोन्सही चाचणी येथे करण्यात येते. त्यामुळे संप्रेरतांशी संबंधित आजारांचे अचूक निदान यातून करता येणार आहे.’’
शहरातील इतर प्रयोगशाळांमध्ये या चाचण्यांसाठी सुमारे एक हजार रुपये खर्च येतो. येथील रुग्णाला ही सुविधा मिळत असल्याने ससून रुग्णालयातील वैद्यकीय सेवेची गुणवत्ता वाढली असल्याचेही रुग्णालय प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

देशातील तरुणांमध्ये मधुमेहाचे प्रमाण वेगाने वाढत आहे. त्यामुळे रक्तातील इन्शुलिनची चाचणी उपयुक्त ठरेल. तसेच, हाडांचे आरोग्य सुदृढ राखण्यासाठी व्हिटॅमिनची चाचणी आवश्‍यक असते. या वैद्यकीय चाचण्यांची सुविधा उपलब्ध असणारे ससून हे राज्यातील पहिले शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालय आहे.
- डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय

Web Title: diabetes care by sasoon hospital