मधुमेहींनो, आजपासूनच साखर नियंत्रित करा | Diabetics | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Diabetes
मधुमेहींनो, आजपासूनच साखर नियंत्रित करा

मधुमेहींनो, आजपासूनच साखर नियंत्रित करा

पुणे - मधुमेहींनो, तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्याचे काटेकोर प्रयत्न आजपासूनच सुरू करा. त्याचा फायदा तुम्हाला कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत होईल. कारण, आतापासून रक्तातील साखर नियंत्रित ठेवल्यास भविष्यात तुम्हाला कोरोना झाला, तरीही त्याच्या उपचारातील गुंतागुंत वाढणार नाही, असा सल्ला मधुमेह तज्ज्ञांनी दिला आहे.

कोरोनाच्या उद्रेकात कोणत्याही व्यक्तीला या विषाणूंचा संसर्ग होण्याचा धोका समान असतो. संसर्ग झाल्यानंतर बरे होण्यासाठी मात्र रुग्णाचे वय, त्याला असलेला मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार अशा सहव्याधींचे वेगवेगळे निकष लागतात. खूप वर्षांपासून अनियंत्रित मधुमेही रुग्णांसाठी कोरोनामुळे जिवाला असलेला धोका समान राहत नाही, तर तो निश्चित वाढतो. कारण, मधुमेहामुळे रुग्णाच्या उपचारातील गुंतागुंत वाढते. तुम्ही मधुमेही आहात म्हणून तुम्हाला कोरोना होणार नाही. पण, तुमचा मधुमेह अनियंत्रित असेल; तर उपचारांना मर्यादा पडतात, हे लक्षात घेऊन तुम्ही आतापासूनच तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्याचे प्रामाणिक प्रयत्न सुरू करा, असा सल्ला मधुमेह तज्ज्ञ डॉ. शैलजा काळे यांनी दिला. मधुमेह नियंत्रित असल्यास कोरोना झाल्यानंतरही उपचारातील गुंतागुंत वाढत नाही, तर प्रकृती सुधारण्याची शक्यता अशा परिस्थितीत वाढते, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

पोस्ट कोव्हिड डायबेटिस

कोरोनानंतर मधुमेही रुग्णांचे प्रमाण वाढल्याचे निरीक्षण मधुमेह तज्ज्ञांनी नोंदविले. विषाणूंचा थेट परिणाम स्वादूपिंडाच्या पेशींवर होतो. त्याच वेळी कोरोना बरा करण्यासाठी स्टेरॉईड्सची औषधे दिली, त्याचा परिणाम म्हणून रुग्णांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले. याला वैद्यकीय परिभाषेत पोस्ट कोव्हिड डायबेटिस असे म्हणतात. कोरोनाचा थेट परिणाम ‘बिटा सेल’वर होतो. कोरोनापूर्वी मधुमेह नसलेल्या रुग्णांना कोरोनानंतर हा विकार झाल्याचे चित्र जगभरात दिसून येत आहे. आपल्याकडेही याचे प्रमाण जास्त असल्याचे डॉ. काळे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा: वाळू लिलावाबाबत लवकरच स्वतंत्र अध्यादेश प्रसिद्ध होईल : बाळासाहेब थोरात

औषधे बंद करू नका

रक्तदाब, हृदयविकार या आजारांवरील औषधांचे महत्त्व कोरोनामध्ये अनन्यसाधारण आहे. ॲस्प्रिनसारखी रक्त पातळ करणारी गोळी स्वतःहून बंद करू नये. त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

...असे ठेवा नियंत्रण

रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवायचे म्हणजे औषधे नियमित घ्यायची. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बहुतांश रुग्ण घराबाहेर पडले नाहीत. नियमित औषधे चुकली. त्याचा फटका दुसऱ्या लाटेत बसला.

नियमित व्यायाम

नियमित केलेल्या हलक्या व्यायामानेही शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते, असे संशोधनातून सिद्ध झाले आहे. त्यामुळे कोरोनाच्या भीतीने घाबरून घरात बसून व्यायाम बंद करू नका. नियमित हलका व्यायाम घरच्या घरीही सुरू ठेवा.

हे करा

  • मास्क, सॅनिटाझर, हात स्वच्छ धुणे, सोशल डिस्टन्सिंगचे भान ठेवा

  • नियमित हलका व्यायाम करा

  • रोजच्या रोज औषधे घ्या

  • कोरोना प्रतिबंधक लस घ्या

साखरेचे प्रमाण कसे असावे?

  • एचबीए1सी : ७ टक्क्यांपेक्षा कमी

  • जेवणाच्या आधी : १०० मिलिग्रॅम/डीएलपेक्षा कमी

  • जेवणानंतर दोन तासांनी : १४० ते १६० मिलिग्रॅम/डीएल

कोरोनानंतर औषधे बदलतात

कोरोना झाल्यानंतर मधुमेहाची औषधे बदलावी लागतात. कोरोनापूर्वी सुरू असलेली औषधे रुग्णांना उपयोगी ठरत नाही. त्यामुळे कोरोनानंतर म्युकरमायकोसिससारखे दुसऱ्या प्रकारचा संसर्ग वाढण्याचा धोका असतो. कोरोनानंतर मधुमेहाची औषधे बदलण्यासाठी सल्ला घ्या.

loading image
go to top