‘डायलिसिस’प्रकरणी गुन्हे दाखल करा

dialysis
dialysis

पिंपरी - किडनी उत्तम असलेल्या तरुणावर यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) डायलिसिस केले. या प्रकरणातील दोषी डॉक्‍टरांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सदस्यांनी स्थायी समितीच्या बैठकीत केली.

बुधवारी महापालिका भवनात झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी विलास मडिगेरी होते. महापालिकेचे दवाखाने आणि रुग्णालयात लागणाऱ्या औषध खरेदीचा विषय मंजुरीसाठी आला होता. त्यावर चर्चा करताना राष्ट्रवादीचे नगरसेवक पंकज भालेकर यांनी प्रशासनावर तोफ डागली. १३ जुलै रोजी ‘सकाळ’मध्ये ‘किडनी उत्तम, तरीही डायलिसिस’ या शीर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली होती. त्याचे पडसाद स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. याबाबत बोलताना भालेकर म्हणाले, ‘‘आनंद अनिवाल या तरुणाचे रक्‍त तपासले असता त्यात क्रिटेनीनचे प्रमाण २४ असल्याचे आढळले. हे प्रमाण कितीतरी पट अधिक होते. मग डॉक्‍टरांनी फेर तपासणी का केली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 

याबाबत उत्तर देताना वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे म्हणाले, ‘‘आनंद यास किडनीच्या आजाराची लक्षणे दिसत होती. त्याची सोनोग्राफीही केली. डायलिसिस हे चुकून झालेले नाही. डायलिसिस म्हणजे शस्त्रक्रिया नसून, रक्‍त शुद्ध करण्याची प्रक्रिया आहे. डायलिसिसनंतर त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली.’’

त्यांच्या खुलाशामुळे संतापलेल्या सदस्यांनी डॉ. वाबळे यांच्यावर प्रश्‍नांची सरबती केली. ‘‘वरिष्ठ तज्ज्ञ डॉक्‍टरांनी आनंद यास का तपासले नाही, मानधनावरील स्थानिक डॉक्‍टरांची समिती का नेमली,’’ असा प्रश्‍नांचा भडिमार त्यांनी केला. आनंद याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे समजल्यावर त्याच्या कुटुंबाची काय अवस्था झाली असेल, याचा विचार केला का, अशी विचारणा राहुल कलाटे यांनी केली. त्यानंतर मयूर कलाटे, राहुल कलाटे यांनी याबाबत प्रशासनाला जाब विचारला.

यावर उत्तर देताना आयुक्‍त श्रावण हर्डीकर म्हणाले, ‘‘ज्या वेळी घटनेबाबत माहिती मिळाली त्या वेळी मी प्रवासात होतो. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नियुक्‍त करा. त्यात ससून रुग्णालयाच्या तज्ज्ञ डॉक्‍टरांना घ्या. अहवाल प्राप्त झाल्यावर चूक झाली असल्यास दोषींवर कारवाई केली जाईल.’’

आयुक्‍तांनी काढलेल्या पर्यायावर सदस्यांनी समाधान व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com