उलट्या, जुलाबाचे रुग्ण वाढले 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 जून 2019

पोटात गेलेले पाणीही पचत नाही... अन्न तर दूरची गोष्ट. गेल्या दोन दिवसांपासून अन्नाचा कणही पोटात गेला नसल्याने आलेला अशक्तपणा... सतत उलट्या आणि जुलाब... अशा तक्रारी, त्याही विशेषतः लहान मुलांना घेऊन पालक डॉक्‍टरांकडे धाव घेत असल्याचे चित्र सध्या शहरात दिसत आहे.

पुणे - पोटात गेलेले पाणीही पचत नाही... अन्न तर दूरची गोष्ट. गेल्या दोन दिवसांपासून अन्नाचा कणही पोटात गेला नसल्याने आलेला अशक्तपणा... सतत उलट्या आणि जुलाब... अशा तक्रारी, त्याही विशेषतः लहान मुलांना घेऊन पालक डॉक्‍टरांकडे धाव घेत असल्याचे चित्र सध्या शहरात दिसत आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून अशा रुग्णांची संख्या वाढल्याचे निरीक्षणही वैद्यकीय तज्ज्ञ नोंदवीत आहेत. 

शहरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कमाल तापमानाचा पारा चाळीस अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदला जात आहे. त्याचबरोबर धायरी, कात्रज, धनकवडी, हडपसर, औंधसह काही भागांत पाण्याची टंचाई प्रकर्षाने जाणवते. त्यामुळे तेथील बहुतांश सोसायट्यांना टॅंकरचे पाणी घ्यावे लागते. तसेच, काही भागांत येणारे पाणीही स्वच्छ नसते. त्यातून पोटाच्या तक्रारी वाढल्या आहेत. 

शहरात सध्या होत असलेले उलट्या-जुलाब हे पर्यावरणात्मक बदलांमुळे आहे. पर्यावरणात झालेल्या बदलांमुळे अनेक गोष्टी घडत असतात. त्याचा हा एक परिणाम आहे. या तक्रारी कोणत्याही विषाणू किंवा जिवाणूंच्या संसर्गामुळे होत नाहीत, तर पर्यावरणातील बदल त्याला जबाबदार आहेत, असेही वैद्यकीय तज्ज्ञांनी स्पष्ट केले. 

लहान मुलांमध्ये याचे प्रमाण जास्त आढळत आहे. त्याबद्दल डॉ. राहुल कदम म्हणाले, ""उन्हाळ्यात लहान मुलांमध्ये पाण्याचे प्रमाण कमी होते. उन्हात फिरले नाही, तरीही तापमानामुळे "डिहायड्रेशन' होते. त्याचा थेट दुष्परिणाम लहान मुलांच्या आरोग्यावर होतो. त्याला वैद्यकीय परिभाषेत "समर डायरिया' म्हणतात.'' 

काय करावे... 
- ताजे अन्नपदार्थ खावेत 
- भरपूर पाणी प्यावे 
- उकळून गार केलेले पाणी प्यावे 

काय करू नये... 
- बाहेरचे अन्नपदार्थ खाणे टाळावे 
- लहान मुलांना उन्हात घेऊन जाऊ नये 
- उष्ण पदार्थांचे सेवन टाळावे 

गेल्या दोन आठवड्यांपासून उलटी-जुलाबाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. पाणी स्वच्छ येत नसावे, उन्हाळ्यामुळेही उलट्या-जुलाबाचे त्रास होतात. तसेच, सुटीमुळे प्रवास होतो. त्यात बाहेरचे खाणे होते. या सर्वांचा परिणाम म्हणून या तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. 
- डॉ. अविनाश भोंडवे, वैद्यकीय तज्ज्ञ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: diarrhoea, Vomiting increased patient in pune