लाडू, चकलीसह घ्या मोहनथाळ, आरसालूचा आस्वाद

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 ऑक्टोबर 2016

पुणे - दिवाळीला नातेवाइकांसहित मित्र-मैत्रिणींना घरी बोलवायचे आणि फराळ करायचा हे ठरलेलेच ! मात्र आता चकली, कडबोळीसहित सर्वधर्मीय नागरिकांकडील पदार्थांचा आस्वाद घेत दिवाळी फराळ करण्याची पद्धती रूढ होऊ लागली आहे. मग बिर्याणी असो, की चिरोटे, मोहनथाळ, शांगुलू (शेवई), आरसालू, बुव्वा पोप्पू (वरण भात) अशा नानाविध पदार्थांचा फराळ करीत सर्वधर्मीय नागरिकही दिवाळीचा आनंद घेत आहेत.

पुणे - दिवाळीला नातेवाइकांसहित मित्र-मैत्रिणींना घरी बोलवायचे आणि फराळ करायचा हे ठरलेलेच ! मात्र आता चकली, कडबोळीसहित सर्वधर्मीय नागरिकांकडील पदार्थांचा आस्वाद घेत दिवाळी फराळ करण्याची पद्धती रूढ होऊ लागली आहे. मग बिर्याणी असो, की चिरोटे, मोहनथाळ, शांगुलू (शेवई), आरसालू, बुव्वा पोप्पू (वरण भात) अशा नानाविध पदार्थांचा फराळ करीत सर्वधर्मीय नागरिकही दिवाळीचा आनंद घेत आहेत.

दिवाळी म्हटले, की चकली, चिवडा, लाडू, शंकरपाळे आणि त्या जोडीला दही असा फराळ करायचा. खरंतर ही पारंपरिक पद्धत; पण विविध धर्मांतल्या नागरिकांनीही त्यांची पारंपरिक पद्धती जपली आहे. पुण्यातही त्याचा प्रत्यय येतो. येथे राहत असलेले विविध धर्मीय नागरिक आनंदोत्सवाने दिवाळीचा आनंद घेत त्यांच्याकडील पदार्थांचा आस्वाद घेण्याकरिता अन्य धर्मीय नागरिकांनाही खास फराळासाठी त्यांच्या घरी आमंत्रित करीत आहेत. मुस्लिम, ख्रिश्‍चन, जैन, तसेच पद्मशाली, माहेश्‍वरी, खंडेलवाल, बंगाली, सिंधी असे अनेक समाजांतील नागरिक त्यांच्या मित्र परिवारास नातेवाइकांस फराळाकरिता आमंत्रित करीत आहेत.

मुस्लिम औकाफ वेल्फेअर ट्रस्टचे कार्याध्यक्ष मुश्‍ताक पटेल म्हणाले, ""माझे मित्र दरवर्षी फराळचे ताट आमच्या कुटुंबीयांकरिता पाठवितात. आम्हीही आमच्या सर्वधर्मीय मित्र परिवाराकरिता शाकाहारी आणि सामिष अशा दोन्ही पद्धतींची बिर्याणी करतो. अनेक वर्षांपासून ही परंपरा आम्ही जपली आहे.'' व्यावसायिक राजीव शहा म्हणाले, ""जैन धर्मीय नागरिकांमध्ये चिरोटे, मोहनथाळ, बेसन आणि रव्याचे लाडू आणि करंज्यांना दिवाळीत विशेष महत्त्व आहे. दिवाळी सर्वांचीच असल्याने एकत्रित येऊन फराळ करण्याचा आनंदही निराळाच असतो. मित्र परिवार नातेवाईक आम्हाला फराळाला बोलवतात. तेव्हा त्यांच्याकडील पदार्थांचा आस्वाद घ्यायला मिळतो. आम्हीही त्यांना बोलावतो तेव्हा तेही जैन धर्मीयांच्या पद्धतीचे पदार्थांचा आस्वाद घेतात.''

गृहिणी रेखा आडप म्हणाल्या, ""पद्मशाली समाजात दाक्षिणात्य पद्धतीचा आरसालू हा पदार्थ आवर्जून करतात. तांदळाच्या पिठामध्ये गूळ, वेलची आणि तूप यांपासून हा पदार्थ तयार होतो. तसेच शांगुलू (शेवई) बुव्वा पोप्पू (वरण भात) आदी पदार्थही तयार करून मित्र परिवारासहित नातेवाइकांसही फराळाला बोलावतो.'' गृहिणी मोनल खंडेलवाल म्हणाल्या, ""खंडेलवाल समाजात बेसनाचे लाडू, बर्फी, मक्‍याचा चिवडा, डिंकाचे (गोंद) लाडू आणि मठरी (शंकरपाळेसारखा पदार्थ) दिवाळीला करतात. आमच्या सोसायटीतील नागरिकांना या निमित्ताने आम्ही फराळाचे पदार्थ देतो. तेही आम्हाला महाराष्ट्रीय पदार्थ देतात.''

गृहिणी शिल्पा मुंदडा म्हणाल्या, ""राजस्थानी पदार्थ पुष्कळ दिवस टिकतात. दिवाळीला माहेश्‍वरी समाजाच्या कुटुंबांमध्ये गव्हाची लाप्शी, गोड पापडी आणि खुर्मा असतोच. महाराष्ट्रात स्थायिक झालेली मंडळी आता एकमेकांच्या पद्धतीचे पदार्थ आवर्जून बनवितात.'' रेव्हरंड मेघा गायकवाड म्हणाल्या, ""दिवाळीला आम्ही अन्य धर्मीय नागरिकांना चॉकलेट, कॅडबरी, सुकामेव्याची पाकिटे भेट देतो. ख्रिसमसमध्ये "डोनट' हा पदार्थ खाण्याकरिता अन्य धर्मीय मित्र मैत्रिणींसही घरी बोलावतो.''

Web Title: Different Diwali food items by different community