शहराचे स्वतंत्र स्थान निर्माण करण्यासाठी "व्हीजन' गरजेचे : हर्डीकर 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जुलै 2018

पिंपरी (पुणे) : "शहराच्या चिरंतन व चिरस्थायी विकासासाठी प्रयत्न व्हायला हवे. शहराचे जागतिक पातळीवर स्वतंत्र स्थान निर्माण करण्यासाठी "व्हीजन' निश्‍चित करावे लागेल. शहर विकास व नियोजनासाठी अधिकाऱ्यांनी वैयक्तिक जबाबदारी स्वीकारावी. शहराचे 2030 पर्यंतचे नियोजन करून त्यानुसार कार्य करण्यासाठी तत्पर राहावे'', अशा सूचना आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. 

पिंपरी (पुणे) : "शहराच्या चिरंतन व चिरस्थायी विकासासाठी प्रयत्न व्हायला हवे. शहराचे जागतिक पातळीवर स्वतंत्र स्थान निर्माण करण्यासाठी "व्हीजन' निश्‍चित करावे लागेल. शहर विकास व नियोजनासाठी अधिकाऱ्यांनी वैयक्तिक जबाबदारी स्वीकारावी. शहराचे 2030 पर्यंतचे नियोजन करून त्यानुसार कार्य करण्यासाठी तत्पर राहावे'', अशा सूचना आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. 

महानगरपालिका शहर परिवर्तन कार्यालयातर्फे शहराच्या 2030 पर्यंतच्या नियोजनाबाबत महापालिका अधिकाऱ्यांसाठी मुळशीतील गरूडमाची येथील प्रशिक्षण केंद्रात कार्यशाळेचे आयोजन केले होते. त्या वेळी ते बोलत होते. दोन दिवसांच्या कार्यशाळेत पॅलेडियमच्या कन्ट्री डायरेक्‍टर बार्बोरा स्टॅंन्कोव्हिकोवा, रॉकी, मधुरा पाठक, किरण पंडित, सिद्धार्थ खन्ना, वैभव पाठक यांनी सादरीकरण केले. 

अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर, दिलीप गावडे, शहर अभियंता अंबादास चव्हाण, मुख्य लेखापरीक्षक आमोद कुंभोजकर, मुख्य लेखापाल राजेश लांडे, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीलकंठ पोमण, सह-शहर अभियंता राजन पाटील, अयुबखान पठाण, प्रवीण तुपे, नगररचना उपसंचालक प्रकाश ठाकूर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे आदींनी कार्यशाळेत सहभाग घेतला. 

कार्यशाळेमध्ये शहर विकासाबाबत अधिकाऱ्यांची मते जाणून घेण्यात आली. शहराची सद्य:स्थिती व त्यामध्ये करावयाच्या सुधारणा, राष्ट्रीय व जागतिक पातळीवर असणाऱ्या मापदंडाबाबत चर्चा झाली. गटचर्चेच्या माध्यमातून विविध विषयांवर विचारमंथन झाले. एकात्मिक चिरंतन विकासासाठी प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांनी योगदान दिल्यास शहर परिवर्तन करणे सुलभ होईल, असे मत व्यक्त करण्यात आले. क्षमता बांधणी व विकास अंतर्गत विविध प्रात्यक्षिकांद्वारे प्रशिक्षण दिले. धोरण आखणी व नियोजनाबाबत चर्चा झाली. अधिकाऱ्यांमधील समन्वय, वैयक्तिक आणि सामूहिक जबाबदारी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. 

हर्डीकर म्हणाले, "शहराच्या विकासाची दिशा ठरवण्यासाठी शहरातील नागरिक व स्वयंसेवी संस्था यांची मते शहर परिवर्तन कार्यालयाच्या माध्यमातून सर्वेक्षणाद्वारे जाणून घेतली जात आहेत. सर्व लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या दृष्टिकोनातून ठरविण्यात येणाऱ्या धोरणाची अंमलबजावणी करताना अधिकाऱ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. दीर्घकालीन व अल्पकालीन "व्हीजन' ठरवावे. शहर परिवर्तनाची दिशा ठरवण्यासाठी पॅलेडियम ही आंतरराष्ट्रीय दर्जाची संस्था कार्यरत आहे. त्यांच्या माध्यमातून शहराचा इतर शहरांशी तुलनात्मक अभ्यास करण्यात येत आहे. सर्व लोकप्रतिनिधींच्या मान्यतेने नागरिक व विविध स्वयंसेवी संस्थांच्या सूचनांचा समावेश असलेले "व्हीजन डॉक्‍युमेंट' तयार केले जाईल. त्याच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी अधिकाऱ्यांनी तत्पर राहावे.'' 

प्रमुख चर्चेचे मुद्दे : 
- प्रभावी वाहतूक सुविधा व व्यवस्था 
- पर्यावरण व नागरिकांना राहण्यास योग्य शहर 
- पर्यटन व सांस्कृतिक वाटचाल 
- प्रशासन व कायदा-सुव्यवस्था 
- माहिती व तंत्रज्ञानातील प्रगती 
- शहराचा आर्थिक विकास 

Web Title: for different identity of city vision is important