डिजिटल व्यवहारासाठी आकारलेले पैसे मिळाले परत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 जून 2019

आपल्या सामान्य तक्रारीची दखल शासनाकडून घेतली जाणार 
नाही, असा अनेकदा आपला समज असतो. पण हा दृष्टिकोन कुठे तरी बदलायला हवा. शासकीय यंत्रणेवर नागरिकांनी विश्‍वास ठेवायला हवा. 
- गौरव जोशी, तक्रारकर्ते

पुणे - डिजिटल इंडिया व कॅशलेस व्यवहारास प्रोत्साहन देण्यासाठी एकीकडे सरकार दरबारी धाडसी निर्णय घेतले जात आहेत. मात्र दुसरीकडे अनेक ठिकाणी डिजिटल व्यवहारावर शुल्क आकारून ग्राहकांची लूट केली जात आहे. असाच काहीसा अनुभव गौरव जोशी यांना नुकताच आला. मात्र याबाबत प्रधानमंत्री कार्यालयाकडे केलेल्या तक्रारीचीही तत्काळ दखल घेण्यात आली आहे.

जोशी यांच्या वडिलांना वैद्यकीय शस्त्रक्रियेसाठी येथील एका नामांकित रुग्णालयात दाखल केले होते. या वेळी ५० हजार रुपये इतकी आगाऊ रक्कम एकाच वेळी भरावी लागेल, असे संबंधित रुग्णालयाने जोशी यांना सांगितले. रोखीच्या व्यवहारावर निर्बंध लादले गेल्याने स्वाभाविकच जोशी यांना क्रेडिट कार्डद्वारे ही रक्कम भरली. परंतु या रकमेवर १.५ टक्‍क्‍यानुसार ७५० रुपये इतके अतिरिक्त शुल्क रुग्णालयाने आकारले. यासंबंधी जोशी यांनी विचारणा केली असता, ‘हे बॅंकेचे शुल्क असून तुम्हाला ते भरावेच लागेल’, असे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. तसेच ‘डेबिट क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास शुल्क आकारले जाईल,’ अशी पाटी देखील रुग्णालयात लावली होती.

जोशी यांना मात्र हे कारण समाधानकारक न वाटल्याने त्यांनी याबाबत प्रधानमंत्री कार्यालयाकडे तक्रार केली. 

प्रधानमंत्री कार्यालयाकडून या तक्रारीची तातडीने दखल घेण्यात आली आणि अवघ्या चार दिवसांतच जोशी यांच्यांशी संबंधित बॅंकेने संपर्क केला. त्यांची समस्या जाणून घेतल्यावर असे कोणतेही शुल्क आमच्या नावे रुग्णालय ग्राहकांना आकारू शकत नाही, असे स्पष्टीकरण या बॅंकेमार्फत देण्यात आले. तसेच आमच्याकडून याची गांभीर्याने दखल घेतली जाईल, असे आश्‍वासनही बॅंकेने जोशी यांना दिले. 

या सर्व प्रकारानंतर जोशी यांना संबंधित रुग्णालयाने आकारलेले शुल्क ऑनलाइन ट्रान्स्फरद्वारेच परत केले. इतकेच नव्हे तर या तक्रारीनंतर 
डिजिटल व्यवहारावर आता कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, असे रुग्णालयाकडून जोशी यांना सांगण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Digital India Cashless Transaction Fee Return Loot