मानसिक रुग्णांना आत्मनिर्भर केले पाहिजे - दिलीप प्रभावळकर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 मे 2018

पुणे - मानसिक रुग्णांच्या भूमिका करताना, त्या व्यक्तिमत्त्वात कलाकार जगत असतो. परंतु त्यांच्यासाठी जगणाऱ्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले पाहिजे. मानसिक रुग्णांना आत्मनिर्भर केले पाहिजे, अशी अपेक्षा ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी गुरुवारी व्यक्त केली.

पुणे - मानसिक रुग्णांच्या भूमिका करताना, त्या व्यक्तिमत्त्वात कलाकार जगत असतो. परंतु त्यांच्यासाठी जगणाऱ्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले पाहिजे. मानसिक रुग्णांना आत्मनिर्भर केले पाहिजे, अशी अपेक्षा ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी गुरुवारी व्यक्त केली.

कर्वे रस्त्यावरील अंबर सभागृह येथे जागतिक स्किझोफ्रेनिया दिन आणि परिवर्तन संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त "मानसरंग' कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी ज्येष्ठ दिग्दर्शक अतुल पेठे, शैला दाभोलकर, डॉ. हमीद दाभोलकर, डॉ. अमित नूलकर आदी उपस्थित होते.

प्रभावळकर म्हणाले, 'मानसिक रुग्ण आजारातून सावरत असताना, त्यांच्यामधील कलागुणांचा आविष्कार पाहायला मिळाला. "चौकट राजा', "रात्रआरंभ' आणि "नातीगोती' यामध्ये मानसिक रुग्णांच्या भूमिका वठविण्यापूर्वी मानसिक रुग्ण, मानसोपचार तज्ज्ञांना भेटलो. या भूमिकांच्या माध्यमातून ती व्यक्तिमत्त्वे मी जगलो. तसा आभास आम्ही निर्माण केला. परंतु, परिवर्तन संस्थेचे कार्यकर्ते त्यांच्यासाठी जगत आहेत. त्यांच्याकडे समाजाने पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे.''

पेठे म्हणाले, 'समाजस्वास्थ्य चांगले राहण्यासाठी मनःस्वास्थ्य चांगले असले पाहिजे. अभिव्यक्त होण्यासाठी सर्वजण माध्यम शोधत असतो. नाटक हे मानसिक आजारांवर उपचारांसाठी प्रभावी माध्यम ठरू शकते. वैद्यकीय उपचार, समुपदेशन मिळाल्यास मानसिक रुग्ण पुन्हा मुख्य प्रवाहात पूर्ववत जीवन जगू शकतात. ''

यावेळी मानसिक आजारांवर उपचार घेत असलेल्या व्यक्तींनी समूहगीत, कवितावाचन सादर केले. ललित देशमुख यांनी सादर केलेली कविता उपस्थितांना भावली.

Web Title: dilip prabhavalkar talking