स्वीय सहाय्यक ते मंत्रीपदापर्यंतचा वळसे पाटलांचा खडतर प्रवास

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 डिसेंबर 2019

उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर दिलीप वळसे-पाटील यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम सुरू केले होते. आज त्यांनी चाैथ्यादा मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. जाणून घेऊयात त्यांचा खडतर प्रवास...

मंचर : उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर दिलीप वळसे-पाटील यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम करण्यास सुरवात केली. राज्यभर फिरून त्यांनी महाराष्ट्र जाणून घेतला. १९९० मध्ये आंबेगाव तालुक्यापत युवा नेतृत्व म्हणून वळसे-पाटील यांचा उदय झाला. वडील माजी आमदार (कै) दत्तात्रेय वळसे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी राजकारणाची सुरुवात केली.

दरम्यान, त्यावेळी जनता दलाचे खासदार असलेले किसनराव बाणखेले यांचा तालुक्याचवर प्रभाव होता. मात्र, १९९० च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवून वळसे-पाटील यांनी बाणखेले यांचे गुरू अपक्ष उमेदवार शिवाजीराव पाटील यांना पराभूत केले. एकेकाळी दुष्काळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंबेगाव विधानसभा मतदार संघाचा कायापालट त्यांनी केला. त्यासाठी वळसे पाटील यांनी हुतात्मा बाबू गेनू जलाशय (डिंभे धरण) या निधीअभावी रेंगाळलेल्या कामाला प्राधान्य दिले. निधी उपलब्ध होण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्याकडे पाठपुरावा केला.

Image result for dilip walse patil sharad pawar hd images

दरम्यानच्या काळात धरणाचे काम पूर्ण होई पर्यंत घोड व मीना या दोन नद्यांवर ४० कोल्हापूर पद्धतीचे बंधारे होण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. उजव्या व डाव्या कालव्याच्या कामाला गती दिली. त्यामुळे आंबेगाव तालुका पाण्याबाबत स्वंयपूर्ण झाला. भीमाशंकर साखर कारखान्याची उभारणी केली. कारखान्याचाही कीर्ती देशभर होण्यासाठी वळसे पाटील यांचे प्रयत्न यशस्वी ठरले. 

त्यानंतर आजपर्यंत सलग सात वेळा विजय मिळवून तीस वर्षे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. युतीचे सरकार असताना विधानसभेत चमकदार कामगिरी केल्याने त्यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार मिळाला. वैद्यकीय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण  विभाग, ऊर्जा, अर्थ आदी महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे सांभाळली.

अवसरी खुर्द येथे शासकीय अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन हि दोन महाविद्यालये व घोडेगाव येथे आय टी आय प्रशिक्षण संस्था सुरु केली. आदिवासी भागात आश्रमशाळा इमारती, भीमाशंकर परिसर विकास, मंचर येथे उपजिल्हा रुग्णालय, क्रीडा संकुल, एसटी आगार, काठापूर, मंचर सह एकूण दहा वीज उपकेंद्र यासह रस्ते पूल, थापलिंग येथे पोलीस प्रशिक्षण केंद्र आदी विकास कामे मोठ्या प्रमाणात त्यांनी केली. त्यामुळे ते आतापर्यंत चढत्या मताधिक्याने विधानसभा निवडणुकीत विजयी झालेले आहेत. 

Image result for dilip walse patil sharad pawar hd images

२००९ ते २०१४ या कालखंडात विधानसभेचे अध्यक्ष पद स्वीकारून पदाची उंची वाढविण्यासाठी महत्वाचे योगदान. मतदार संघातील माळीण गावात दुर्दैवी झालेल्या घटनेत जातीने लक्ष घालून आपत्तीच्या दिवसापासून ते पुनर्वसनामध्ये जातीने लक्ष घालून वेगळेपण दाखवून दिले. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी काम करत असताना साखर उद्योग व शेतकऱ्यांसाठी देशपातळीवर काम केले. १४ ऑगस्ट २०१७ वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या उपाध्यक्ष पदावर निवड झाली. 

नाव - दिलीप दत्तात्रेय वळसे पाटील
पत्ता - निरगुडसर, ता. आंबेगाव, जि. पुणे.
जन्म - ३० ऑक्टोरबर १९५६
शिक्षण - बी.ए., एल.एल.एम., वृत्तपत्रविद्या पदविका.
राजकीय पक्ष - राष्ट्रवादी कॉंग्रेस

विधानसभेची पहिली निवडणूक - इ.स. १९९०. नंतर सलग सात वेळा आमदार म्हणून आंबेगाव- शिरूर मधून निवड.

ठळक कार्य - 
आंबेगावमधील अतिरिक्त दुधाचा प्रश्ने सोडविला. भीमाशंकर साखर कारखान्याची उभारणी, कृषी प्रक्रिया उद्योगाला चालना, तालुक्या‍त बंधाऱ्यांची साखळी उभारली.

Image result for dilip walse patil hd images

सामाजिक कार्य - 
•    विद्यार्थी जीवनापासून सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग.
•    १९८५ मध्ये मॉस्को येथे आंतरराष्ट्रीय युवक महोत्सवात देशाचे प्रतिनिधित्व.
•    १९८९ मध्ये कोरियामधील प्यॉगयॉंग येथे आंतरराष्ट्रीय युवक महोत्सवात देशाचे प्रतिनिधित्व.

Image result for dilip walse patil

राजकीय कारकीर्द - 
•    वैद्यकीय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण  विभाग, ऊर्जा विभागासारखे महत्त्वाचे मंत्री पदी कामकाज
•    संचालक - पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक.
•    चेअरमन - अंदाज समिती, महाराष्ट्र शासन.
•    संस्थापक अध्यक्ष - भीमाशंकर सहकारी साखर कारखाना लि., पारगाव तर्फे अवसरी बु. ता. आंबेगाव, जि. पुणे.
•    उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार हा सन्मान प्राप्त.
•    ७ नोव्हें, २०१५ रोजी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघाच्या अध्यक्षपदी निवड 
•    रयत शिक्षण संस्थेत मॅनेजिंग कौन्सिल सदस्य 
•    १४ ऑगस्ट २०१७ वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या उपाध्यक्ष पदावर निवड 
•    ३० डिसेंबर २०१९ कॅबीनेट मंत्री पदावर निवड.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dilip Walse Patil sworn in as minister