‘दिलीप वळसे-पाटील विधानसभाच लढवणार’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 एप्रिल 2018

टाकळी हाजी - ‘‘भविष्यात येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील हे शिरूर लोकसभेचे उमेदवार नाहीत,’’ असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. मात्र, शिरूर लोकसभा व विधानसभेसाठी उमेदवारी कोणाला देणार, हे गुलदस्तात ठेवले.

टाकळी हाजी - ‘‘भविष्यात येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील हे शिरूर लोकसभेचे उमेदवार नाहीत,’’ असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. मात्र, शिरूर लोकसभा व विधानसभेसाठी उमेदवारी कोणाला देणार, हे गुलदस्तात ठेवले.

शिरूर लोकसभा मतदारसंघात गेली १५ वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला हार पत्करावी लागत आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार कोण असेल, याबाबत उत्सुकता आहे. दरम्यान, वळसे-पाटील हे उमेदवार असतील, अशीही चर्चा होती. याबाबत शिरूर येथे आज झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेच्या हल्लाबोल आंदोलनाच्या सभेत निर्णय होईल, अशी चर्चा सुरू होती. मात्र, अजित पवार यांनी, ‘वळसे पाटील हे लोकसभेला उमेदवार नसतील; तर ते विधानसभाच लढतील,’ असे स्पष्ट केले.

तसेच, शिरूर विधानसभा मतदारसंघात उमेदवारीसाठी माजी आमदार अशोक पवार व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांच्यात चढाओढ सुरू आहे. त्यातून कोणाला संधी मिळणार, याबाबत अजित पवार काही संकेत देतील, अशी चर्चा होती. त्यावर ते म्हणाले, ‘‘बारामतीतून मी; तर आंबेगावमधून वळसे-पाटील विधानसभेची निवडणूक लढविणार आहेत. फक्त पक्षाने तिकीट दिले तर...’’ त्या वेळी उपस्थितांतून, ‘शिरूरमधून कोण?’ असा आवाज दिला गेला. त्यावर अजित पवार यांनी, ‘‘कोणाला खासदार करायचे अन्‌ कोणाला आमदार करावयाचे, हे आम्ही ठरविणार आहे. आता विचार करसाल की, या बाबाच्या डोक्‍यात नक्की काय चाललय? गमतीचा भाग सोडा. पण, शेवटी याबाबतचा निर्णय हा सर्वोच्च नेते शरद पवार हेच घेतात.’’ एवढेच म्हणत शिरूर लोकसभा व विधानसभा उमेदवारीविषयी जास्त बोलण्याचे त्यांनी टाळले. त्यातून अशोक पवार व प्रदीप कंद यांच्यांत कोणाला खासदार अन्‌ कोणाला आमदार करणार, याविषयी राजकीय वर्तुळात आता चर्चा रंगू लागली आहे.

Web Title: dilip walse patil vidhansabha election politics