रुग्णाच्या नातेवाइकांकडून तोडफोड

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 मे 2018

पुणे - दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात महिला रुग्णाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याप्रकरणी रुग्णाच्या नातेवाइकांनी डॉक्‍टरांना दोषी ठरवीत रुग्णालयातील वस्तूंची तोडफोड केली. ही घटना सोमवारी घडली. दरम्यान, संतप्त नातेवाइकांनी डॉक्‍टरलाही मारहाण केली. पोलिसांनी तिघांना अटक केली असून, दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी रुग्णालयाच्या प्रशासन विभागाचे सहायक व्यवस्थापक नितीन महाबळ (वय ३८, रा. कोथरूड) यांनी अलंकार पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून विठ्ठल बबन वाघमारे (वय ३९), सिद्धेश्‍वर तानाजी गायकवाड (वय २४) व अनिकेत भारत रणदिवे (वय २४, सर्व रा. तळजाई वसाहत, पद्मावती) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. मृत महिलेचे पती दत्ता बबन वाघमारे (वय ३५) यांच्यासह उर्वरित दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
वाघमारे यांच्या पत्नी रेश्‍मा (वय ३०) या श्‍वसन व संधिवाताच्या आजाराने त्रस्त होत्या. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांच्या नातेवाइकांनी त्यांना मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचार सुरू असताना रेश्‍मा यांचा सोमवारी मध्यरात्री मृत्यू झाला. रेश्‍मा यांचा मृत्यू डॉक्‍टरांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप करीत रुग्णाच्या नातेवाइकांनी गोंधळ घालण्यास सुरवात केली. तेथे दाखल झालेल्या पोलिसांनीही नातेवाइकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, नातेवाइकांनी पहिल्या मजल्यावरील लोखंडी बाक तळमजल्यावरील स्वागत कक्षात फेकून दिले. काही बाकांची तोडफोड करून स्वागत कक्षातील दूरध्वनी व संगणकांचे नुकसान केले.

रुग्णाच्या नातेवाइकांना समजावून सांगितल्यानंतरही त्यांनी तोडफोड केली. त्यामुळे तिघांना अटक केली आहे; परंतु रुग्णाला वेळेत किंवा योग्य उपचार मिळाले नसल्याचा नातेवाइकांचा आरोप आहे. वैद्यकीय तज्ज्ञांकडून याचा तपास केला जाईल.
- शरद जाधव, पोलिस उपनिरीक्षक

Web Title: dinanath mangeshkar hospital damage by patient relatives