डिप्लोमाच्या जागांबाबत अजब भूमिका

AICTE
AICTE

पुणे - अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमानंतर (डिप्लोमा) पदवी अभ्यासक्रमाच्या (पदवी) दुसऱ्या वर्षाला प्रवेशासाठी असलेला २० टक्के जागांचा कोटा कमी करून १० टक्के केल्यामुळे विद्यार्थ्यांवर कोणताही अन्याय होणार नाही. ग्रामीण भागातील अभियांत्रिकी पदवी महाविद्यालयेदेखील चालायला हवीत, अशी भूमिका ‘एआयसीटीई’ने घेतली आहे.

या संदर्भात राज्यसभा खासदार वंदना चव्हाण यांनी ‘एआयसीटीई’चे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे यांना पत्र लिहिले होते. या पत्रात ‘डिप्लोमा’च्या जागा पूर्ववत ठेवण्याची मागणी केली होती. त्यावर खुलासा करताना सहस्त्रबुद्धे यांनी अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या जागा रिक्त राहात आहेत. शिवाय या जागा कमी करण्याची मागणी देशातील ग्रामीण भागातील महाविद्यालयांनी केल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. विशेष म्हणजे या निर्णयामुळे विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकाराचा अन्याय होत नसल्याचे म्हटले आहे.  

पंधरा दिवसांपूर्वी ‘एआयसीटीई’ने घेतलेल्या या निर्णयामुळे अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षाच्या सुमारे साडेदहा हजार जागा कमी झाल्या आहेत.

‘एआयसीटीई’ने यासाठी अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या जागा रिक्त राहात असल्याचे कारण दिले आहे. मात्र, या निर्णयामुळे प्रवेशासाठी स्पर्धा होती, अशा महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या संधी कमी झाल्या आहेत.

मेलला ‘एआयसीटीई’कडून उत्तरच नाही
राज्यातील सुमारे एक हजार पालकांनी ‘एआयसीटीई’ला मेल करून जागा कमी करण्याच्या निर्णयाला विरोध केला आहे. जागा पूर्ववत ठेवण्यात याव्यात, अशी मागणी केली आहे. मात्र, यापैकी एकाही पालकाच्या मेलला ‘एआयसीटीई’ने उत्तर दिलेले नाही, हे विशेष.

डिप्लोमाच्या चांगल्या अभ्यासक्रमाला लगाम घालण्याचा हा प्रयत्न आहे. डिप्लोमा अभ्यासक्रम पूर्ण करून अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाला जाण्यासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय अन्याय करणारा आहे. 
 - वंदना चव्हाण, खासदार

जागा कमी केल्याने सध्या डिप्लोमाच्या पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाला असलेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे. २०२१-२२ च्या शैक्षणिक वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी केली, तर किमान पुरेशा वेळेत कल्पना देऊन निर्णय घेतल्यासारखे होईल. त्यामुळे अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षाला प्रवेश घेण्याच्या उद्देशाने ‘डिप्लोमा’ला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही. 
- अभय पालवणकर, पालक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com