
DIAT : हवाई मार्गातून थेट पाण्याखाली संदेश!
पुणे : देशाला तब्बल साडेसात हजार किलोमीटर लांबीचा सागरी किनारा असून राष्ट्रीय सुरक्षिततेसह व्यापार आणि सागरी संपत्तीचे संरक्षण हे मोठे आव्हान आहे. सागरी क्षेत्रावर लक्ष ठेवण्याबरोबरच नौदलाच्या पाणबुड्यांशी सातत्याने संपर्क ठेवणे गरजेचे असते. यासाठी आता अद्ययावत लेझर आधारित संपर्क प्रणाली विकसित करण्यात आली आहे.
पुण्यातील डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ एडव्हान्स्ड टेक्नॉलॉजीच्या (डीआयएटी) उपयोजित भौतिकशास्त्र विभागाने ‘लेझर असिस्टेड फोटो-अकॉस्टिक वेव्ह जनरेशन’ या प्रणालीची निर्मिती केली आहे. खोल समुद्रात नेहमीच्या रेडिओ संदेशवहन प्रणालीपेक्षा ही प्रणाली अधिक प्रभावी ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे नौदलाला टेहळनी बरोबरच पाणबुड्यांशी संपर्क ठेवणे आणि युद्ध काळात तातडीने हालचाल करणे शक्य होणार आहे.
याबाबत डीआयएटीचे कुलगुरू डॉ. सी. पी. रामनारायणन म्हणाले, ‘‘हवेतून पाण्याखाली संपर्क करण्याची प्रक्रिया अत्यंत अवघड असते. समुद्राचे खारे पाणी त्याच्या अस्थिर लाटा, त्याची खोली अशा विविध घटकांचा अभ्यास या प्रणालीसाठी महत्त्वाचा आहे. त्यानुसार या प्रणालीची प्रत्यक्षात अशा सर्व परिस्थितींमध्ये चाचणी करून त्यानुसार त्यात अपेक्षित बदल करण्यात येईल.

त्यामध्ये याची खोलपर्यंत जाण्याची क्षमता, अचूकता अशा वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश असेल. सध्याच्या घडीला नौदलासमोर तसेच ‘डीआरडीओ’च्या प्रयोगशाळांना या प्रणालीचे सादरीकरण केले आहे. दरम्यान त्यांच्याद्वारे ही या प्रणालीसाठी पसंती दाखविण्यात आली आहे.’’
अशी आहे प्रणाली
फोटो-अकॉस्टिक (पीए) प्रभाव म्हणजे पाण्याने शोषलेल्या लाइटच्या आधारे लहरींची निर्मिती
या लहरी प्राप्त करण्यासाठी लेझर प्रकाशाची तीव्रता कमी जास्त करावी लागते
पिझोइलेक्ट्रिक सेंसरवर निर्माण झालेल्या ध्वनी लहरींच्या आधारे फोटो अकॉस्टिक इफेक्ट निश्चित केला जातो.
प्रणालीचे फायदे
उच्च देखभाल आणि महागड्या संयत्रणाची आवश्यकता नाही
हवेतून थेट पाण्याखालील यंत्रणांशी संवाद प्रस्थापित करणे शक्य
सध्या अस्तित्वात असलेल्या रेडिओ किंवा प्रकाश संप्रेषणापेक्षा हे अधिक प्रभावी
संपूर्ण प्रणालीची खर्च आणि देखभाल किफायतशीर