पीएमपीतील सुधारणांना संचालकांचा ‘ब्रेक’

PMP-Bus
PMP-Bus

पुणे - पीएमपीच्या बसची आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे ‘ना नफा, ना तोटा’ तत्त्वावर देखभाल-दुरुस्तीसाठीच्या टाटा कंपनीचा प्रस्ताव दोन्ही महापालिकांच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी लांबणीवर टाकला. यामागील अर्थकारण समजून घेतल्यावर त्याच्या मंजुरीचा निर्णय घेतला जाईल, असा सूर ‘माननीयांनी’ संचालक मंडळाच्या बैठकीत आळवला. मार्गांच्या सुसूत्रीकरणाचा प्रस्तावही लांबणीवर टाकला. त्यामुळे पीएमपीमध्ये सुधारणांना ‘ब्रेक’ लागण्याची चिन्हे आहेत. 

पीएमपीच्या १४० बसची देखभाल-दुरुस्ती करण्यासाठी कोथरूड आगारात वर्कशॉप उभारण्याचा प्रस्ताव ‘टाटा’ने दिला आहे. पीएमपी प्रशासनाने प्रायोगिक तत्त्वावर याची अंमलबजावणी करण्यासाठी दोन्ही महापालिकांचे महापौर, स्थायी समितीचे अध्यक्ष आणि संचालकांचा समावेश असलेल्या संचालक मंडळाकडे परवानगी मागितली होती. ‘टाटा’ला प्रतिबस प्रति किलोमीटर दराने पीएमपी देखभाल-दुरुस्तीचा खर्च देणार आहे. मात्र, त्याचे तपशील समजल्याशिवाय हा प्रस्ताव मंजूर करणार नाही, असे संचालकांनी सांगितले. 

माजी सैनिकांच्या बस पीएमपीत 
माजी सैनिकांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांतर्गत खरेदी केलेल्या सीएनजीवर धावणाऱ्या ४४ बस पीएमपीच्या ताफ्यात दाखल करून घेण्यास संचालकांनी मंजुरी दिली. यापूर्वीच्या संचालक मंडळाने खासगी ठेकेदारांकडून ६३ रुपये प्रति किलोमीटर दराने बस भाडेतत्त्वावर घेऊन त्या पीएमपीत दाखल केल्या होत्या. मात्र, माजी सैनिकांनी त्याच दर्जाच्या बस ५७ रुपये प्रति किलोमीटर दराने पुरविण्याची तयारी दर्शविली. त्याला मंजुरी मिळाली आहे.

मार्गांबाबतचा प्रस्तावही लांबणीवर 
पीएमपीच्या ३०० मार्गांचे तज्ज्ञ आणि अभ्यासक कंपनीकडून सुसूत्रीकरण करून घ्यावे, असा प्रस्ताव मांडला होता. परंतु, समितीने त्याबाबतच्या अटी-शर्ती तयार कराव्यात. त्याला संचालक मंडळाने मंजुरी दिल्यावरच निविदा मागवाव्यात, असा निर्णय दोन्ही महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला. पीएमपीच्या ताफ्यात दाखल झालेल्या २३३ मिडी बसच्या देखभाल-दुरुस्तीसाठी निविदा मागविण्याचा प्रस्ताव संचालक मंडळाने मंजूर केला. पीएमपीच्या ताफ्यात या बस दोन वर्षांत टप्प्याटप्प्याने दाखल झाल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com