#PuneRains नाला गार्डनमुळे आपत्ती!

 #PuneRains नाला गार्डनमुळे आपत्ती!

पुणे - नाल्यामध्ये बांधकाम करण्यास कायद्याने परवानगी नसताना आंबिल ओढ्यात सुशोभीकरणाच्या नावाखाली नाला गार्डन आणि क्रीडा संकुलाच्या उभारणीला परवानगी दिल्यामुळेच या नाल्याला पूर आल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाने महापालिकेला नोटीस दिली असून, तिचे उत्तर महापालिकेने अद्याप दिलेले नाही. 

एका लोकप्रतिनिधीच्या आग्रहाखातर आंबिल ओढ्यात नाला गार्डन विकसित करण्याचे ठरविण्यात आले. 

अतिक्रमणे आणि बेकायदा झोपड्यांना पायबंद घालण्यासाठी नाला गार्डन विकसित करणे आवश्‍यक असल्याचे कारण त्या वेळी देण्यात आले. परंतु आंबिल ओढा शासनाच्या मालकीचा असल्याने आणि केवळ देखभाल दुरुस्तीसाठी पालिकेकडे सोपविण्यात आला असल्याने नाला गार्डन विकसित करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे महापालिकेने परवानगी मागितली. जिल्हाधिकारी कार्यालयाने आंबिल ओढ्यामध्ये कोणत्याही प्रकारचे

कच्चे किंवा पक्‍क्‍या स्वरूपाचे बांधकाम करता येणार नाही तसेच नाला गार्डन विकसित करताना ओढ्याच्या नैसर्गिक प्रवाहास अडथळा येणार नाही, या अटीवर ना हरकत प्रमाणपत्र दिले. त्यानंतर पालिकेने तिथे नाला गार्डन विकसित केले. मात्र, नैसर्गिक प्रवाहास अडथळा येणार नाही, ही अट साफ धुडकावून महापालिकेने नाला गार्डन विकसित केले.

नाला गार्डन उभारल्यावर महापालिकेने आंबिल ओढ्यात त्याच लोकप्रतिनिधीच्या आग्रहाखातर क्रीडा संकुल उभारण्याचा घाट घातला. आंबिल ओढा ही जागा शासनाच्या मालकीची असल्याने त्या जागेवर काहीही करण्यासाठी शासनाची पूर्वपरवानगी घेणे आवश्‍यक होते. परंतु तसे न करता पालिकेने चक्क आंबिल ओढ्यात क्रीडा संकुल उभारले. त्यानंतर हे क्रीडा संकुल भाड्याने देण्याबाबत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली.

या जनहित याचिकेसंदर्भात राज्य शासनाने आंबिल ओढा ही जागा राज्य शासनाची असल्याचे नमूद केले आणि या पालिकेने कोणत्या अधिकारात बांधकाम केले, अशी विचारणा करणारी नोटीसही १८ ऑक्‍टोबर २००२  रोजी पालिकेला दिली. परंतु पालिकेने आजतागायत त्या नोटिशीला उत्तर दिलेले नाही आणि त्याचे परिणाम नागरिकांना भोगावे लागले. त्यामुळे या बाबत संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी सुराज्य संषर्घ समितीने जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे. 

यासंदर्भात नगरसेवक आबा बागुल यांच्याशी संपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com