Pune Rains : अनधिकृत बांधकामांमुळे आपत्ती - पालकमंत्री

Pune Rains : अनधिकृत बांधकामांमुळे आपत्ती - पालकमंत्री

पुणे - ‘‘पुणे शहरातील ओढ्या-नाल्यांलगत अनधिकृत बांधकामे झाली आहेत. यामुळे आपत्तीची परिस्थिती ओढावली. या बांधकामांना परवानगी कुणी दिली, ती कुणी बांधली, याची चौकशी करण्यात येईल,’’ अशी माहिती पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

पुण्यात पुरामुळे झालेल्या नुकसानीची आज पाटील यांनी पाहणी केली. नंतर त्यांनी भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. महापौर मुक्ता टिळक, खासदार गिरीश बापट, शहराध्यक्ष माधुरी मिसाळ या वेळी उपस्थित होते. ते म्हणाले, ‘‘आचारसंहिता सुरू असल्यामुळे काही घोषणा करण्यावर मर्यादा येत आहेत. परंतु, आपत्तीग्रस्तांना आर्थिक मदत देता यावी, तसेच कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरस्थितीनंतर पूररेषेबाबत जारी केलेले शासन निर्णय या भागांसाठी लागू करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितली आहे.’’

आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी सरकारी यंत्रणा उशिरा आली, या आरोपाबाबत पाटील म्हणाले, ‘‘पावसाचे रौद्र रूप असेल, अशी पूर्वसूचना नव्हती. परंतु शासकीय यंत्रणा तत्काळ सतर्क झाली. अनेक ठिकाणी त्यांनी शक्‍य तितक्‍या लवकर मदत पोचवून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे. पालकमंत्री कुठे आहेत, अशी विचारणा विरोधकांनी केली. परंतु, घटना घडल्याच्या रात्रीपासून मी जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात होतो. त्यांना सर्व मदत पोचविण्याच्या सूचनाही दिल्या.’’

पुण्यातील प्राथमिक माहितीनुसार चौदा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांना सर्वतोपरी आर्थिक मदत पोचविण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत. भाजप कार्यकर्त्यांना स्वयंसेवक बनून काम करण्याचे आवाहन केले आहे. काही लोक बेपत्ता आहेत, त्यांचा शोध सुरू आहे. आचारसंहितेचा काळ असल्याने या प्रकरणी कोणतीही मदत जाहीर करण्यावर तसेच चौकशीसाठी समिती स्थापन करण्याबाबत बंधने आहेत. परंतु आचारसंहिता संपल्यानंतर योग्य कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

...तर निम्मे शहर खाली करावे लागेल
नद्यांची नाले करण्यात आले आहेत, त्यांच्या पूररेषा निश्‍चित नाही, असे निदर्शनास आणून दिल्यानंतर, ‘‘पूररेषेप्रमाणे कारवाई केली, तर निम्मे शहर खाली करावे लागेल. पण यातून काय मार्ग काढण्यासाठी भारतीय प्रशासकीय सेवेतील तीन अधिकाऱ्यांची समिती आधीच नियुक्त केली आहे,’’ असे चंद्रकांत पाटील यांनी मान्य केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com