आपत्तिग्रस्त माळीण पुन्हा उभे राहतेय

आपत्तिग्रस्त माळीण पुन्हा उभे राहतेय

पुणे - ३० जुलै... माळीणवासीयांसाठी त्यादिवशी सूर्योदय झालाच नाही, पहाटे घडलेल्या महाविध्वंसकारी नैसर्गिक आपत्तीने गावकऱ्यांच्या आयुष्यात काळोख निर्माण झाला अन्‌ गाव कायमचे लुप्त होते की काय, अशी शंका मनाला चाटून गेली; परंतु, दोन-अडीच वर्षांतच हे गाव पुन्हा उभे राहते आहे, अंगावर जुन्या जखमा आहेतच; मात्र त्याला कुरवाळत बसण्यापेक्षा, त्यातून मन घट्ट करण्याचा संदेश घेत आपत्तीतून बचावलेले माळीणवासीय आयुष्याच्या वाटेवर चालते झाले आहेत. राज्य सरकार, जिल्हा प्रशासन, स्वयंसेवी संस्था आणि इतर अनेक घटकांच्या अथक प्रयत्नांमुळे हे अशक्‍यप्राय वाटणारे आव्हान पेलले गेले आहे. येत्या मार्चमध्ये घरकुल हस्तांतराचा कार्यक्रम होणार आहे.

डोंगराच्या कुशीत वसलेल्या माळीण गावाचा धुवांधार पावसाने ३० जुलैच्या पहाटे पाच वाजता घात केला. डोंगराचा दगड, मातीचा कडा गावावर कोसळला. कर्ते पुरुष, मुले, महिला यांचा बळी गेला. त्या आपत्तीमध्ये चाळीसवर लोकांचा मृत्यू झाला. बारा कुटुंबे अशी होती की त्यांचा एकही वारस राहिला नाही. सात ते पंधरा वर्षे वयोगटातील सहा मुले उघड्यावर आली होती. या भीषण आपत्तीतून बचावलेल्या नागरिकांच्या मनामध्ये खोलवर जखम झाली. दुर्घटनेनंतर तेथील परिस्थिती पूर्वपदावर आणणे हे पहिले आव्हान होते, तर दुसरे आव्हान होते पुनर्वसनाचे. घरे तर बांधली जाणारच होती; परंतु भग्न झालेली मने उभी करण्याचे सर्वांत मोठे आव्हान होते. जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी हे आव्हान स्वीकारले आणि तीन वर्षे पूर्ण व्हायच्या आत माळीण पुन्हा उभे केले आहे. या कामामध्ये अनेकांचा हातभार लागला. एम्पथी फाउंडेशन, क्रेडाई, सिटी कॉर्पोरेशन, शाश्‍वत संस्था, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आदींच्या सहकार्यामुळेच हे शक्‍य झाले आहे, असे जिल्हाधिकारी आवर्जून नमूद करतात. यानिमित्ताने ‘सीएसआर’ निधी एखाद्या गावाच्या पुनर्वसनासाठी वापरल्याने देशातील असे पहिले ‘मॉडेल’ निर्माण झाले. 

माळीणच्या पुनर्वसनासाठी पहिले आव्हान होते ते जागा निश्‍चित करण्याचे. त्यासाठी अनेक महिने लागली. कारण एकमत होत नव्हते. नव्या जागी जाऊन राहण्यासाठी गावकऱ्यांची मानसिकता होत नव्हती. त्यांच्या रोजीरोटीची सोय त्याच भागात असल्याने त्यांना खूप दूर नेणेही योग्य नव्हते. अखेरीस जागा निश्‍चित झाली, मात्र ती कितपत सुरक्षित आहे, नैसर्गिक आपत्तीचा पुन्हा धोका संभवतो का, हे तपासणे आवश्‍यक होते. त्यासाठी पुण्याच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगची (सीओईपी), तसेच जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाची मदत झाली. 

राज्य सरकारने माळीणला भरीव मदत केली. अंतर्गत सुविधांसाठी सात कोटी, तर घरांसाठी दीड कोटी रुपये दिले. सरकारच्या प्रचलित नियमांनुसार प्रतिघरकुल दोन लाखांपेक्षा अधिक खर्च करता येत नव्हता. घरांचा पूर्वीचा आराखडा होता २६९ वर्ग फुटांचा; मात्र नागरिकांनी ४२५ वर्गफुटांच्या आकाराच्या घरांची मागणी केल्याने बजेट मोठे झाले. ‘सीओईपी’ने नव्याने बनवून दिलेल्या आराखड्यांनुसार एका घरकुलावर आठ लाख रुपये खर्च होणार होता. या समस्येवर मात करण्यासाठी जिल्हाधिकारी राव यांनी ‘सीएसआर’ निधीसाठी आवाहन केले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. एम्पथीने भरीव मदत केली, ‘सीएसआर’चा पैसा आल्याने ‘घरांचे थर्ड पार्टी ऑडिट’ करून त्यात आणखी पारदर्शकता आणली. त्यानंतर सिटी कॉर्पोरेशननेही मदतीचा हात पुढे करत ‘आयलॅंड’ विकसित केले. जिल्हा प्रशासनाचे अथक प्रयत्न आणि अनेकांच्या हातभारामुळे आजघडीला तेथे ६८ टुमदार घरकुले उभी राहिली आहेत. प्रत्येकाला १५०० वर्गफुटांची जागा देण्यात आली आहे. घर सोडून सुमारे हजार वर्गफूट जागा गुरेढोरे बांधणे व अन्य कामांसाठी म्हणून नियोजनातच निश्‍चित करण्यात आली होती. गावासाठी लागणाऱ्या आवश्‍यक सुविधांचे कामही पूर्ण झाले आहे.

गावपण जपण्याचा प्रयत्न : जिल्हाधिकारी 
प्रत्येक गावाची एक ‘परिसंस्था’ (इकोसिस्टीम) असते. तिला धक्का लागला तर त्याचे गावपण संपते. माळीण पुन्हा उभे करताना त्याची ‘इकोसिस्टीम’ तशीच राहील याची पूर्णत: काळजी घेतली आहे. मागणीनुसार घरे बांधण्यासाठी अधिक पैसा लागत होता; त्यावर आम्ही उपाय शोधला; परंतु मानसिक पुनर्वसन आणि तेथील स्थानिक अर्थव्यवस्थेला पुन्हा गती देणे, ही आमच्यासमोर मोठी आव्हाने होती. आम्ही आता कोणासाठी जगायचे, आम्ही आत्महत्या करणार, अशी लोकांची मानसिकता बनली होती. काही संस्थांच्या मदतीमुळे आम्ही त्यावरही मात करू शकलो. मानसिक आधारासाठी २० शिबिरे घेतली. सुमारे ६५ मुलांची कलचाचणी घेऊन त्यांना प्रशिक्षण दिले. त्यातील ४० मुलांना नोकरी मिळाली. सिटी कॉर्पोरेशनच्या मदतीने १० महिला बचत गट स्थापन केले आहेत. त्यांना गोधडी शिवण्याचे प्रशिक्षण देऊन साहित्य पुरवठा आणि विक्रीची जबाबदारी सिटी कॉर्पोरेशनने घेतल्याने दरमहा पाचेक हजारांच्या उत्पन्नाची हमी या महिलांना मिळाली आहे. माळीण हा आता जिल्हाधिकारी राव यांचाही भावनिक विषय झाल्याचे ते भरभरून बोलतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com