विसर्ग झपाट्याने कमी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

जिल्ह्यातील बहुतांश धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गुरुवारी दिवसभरात पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे भामा आसखेड, मुळशी वगळता इतर धरणांमधून विसर्ग कमी करण्यात आला.

‘खडकवासला’तून ९,४१६  तर पवनातून ९,२०१ क्‍युसेक
पुणे - जिल्ह्यातील बहुतांश धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गुरुवारी दिवसभरात पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे भामा आसखेड, मुळशी वगळता इतर धरणांमधून विसर्ग कमी करण्यात आला. खडकवासला धरणातून दिवसभरात विसर्ग कमी करीत रात्री नऊ हजार ४१६ क्‍युसेक करण्यात आला. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

खडकवासला धरणातून विसर्ग वाढविण्यात आल्यामुळे नदीकाठच्या परिसरात पूरस्थिती निर्माण झाली होती. 

खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गुरुवारी सायंकाळी सहापर्यंत दोन मिलिमीटर पाऊस झाला. वरसगाव आणि पानशेत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात प्रत्येकी १३ मि.मी. आणि टेमघर धरणाच्या  क्षेत्रात ४५ मि.मी. पावसाची नोंद झाली.

 खडकवासला धरणातून सकाळी ३३ हजार ५०६ क्‍युसेक होता. तो रात्री दहा वाजता नऊ हजार ४१६ क्‍युसेक करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या भागातील पुराचे पाणी ओसरण्यास मदत होईल. तसेच प्रशासनाला तेथील नागरिकांच्या घरांचे पंचनामे करणे शक्‍य होणार आहे. 

भामा आसखेड धरणातून विसर्ग सहा हजार ४५७ क्‍युसेकवरून १० हजार ५२७ क्‍युसेक वाढविला आहे. मुळशी धरणातील विसर्ग सकाळी नऊ हजार क्‍युसेक होता. तो १८ हजार ८३७ क्‍युसेक करण्यात आला. वीर आणि चासकमान धरणातूनही विसर्ग कमी करण्यात आला आहे. दिवसभरात मुळशी, वडीवळे, डिंभे, माणिकडोह आणि नीरा देवधर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जेमतेम पाऊस झाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Discharged rapidly reduced