महाराजकारण, महाशिवआघाडीची चर्चा स्मशानातही ! 

mahashivaghadi
mahashivaghadi

मंचर (पुणे) : आंबेगाव तालुक्‍यात दशक्रिया विधीला फार महत्त्व आहे. सभेचे स्वरूप या विधीला येते. सध्या राज्यात महाशिवआघाडीची चर्चा सुरू आहे. त्याचा बोलबाला तालुक्‍यातील दशक्रियाविधीत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यातून शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकमेकाला चिमटे काढल्यानंतर उपस्थितांमध्ये हास्याचे फवारे उमटत आहेत. 

आदर्शगाव गावडेवाडी येथे ज्येष्ठ शिवसेना नेते उत्तम गावडे यांच्या दशक्रिया विधीच्या फ्लेक्‍सवर शोकाकुलमध्ये शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उल्लेख होता. या विधीवेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्ञानेश्वर सोनू गावडे यांनी, ""महाशिवआघाडीमुळे शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकर्त्यांना एकत्रच काम करावे लागेल,'' असे म्हणताच समोरच बसलेले शिवसेनेचे नेते अरुण गिरे म्हणाले, ""आता तुम्हाला आमच्याकडेच यावे लागेल.'' त्यावर क्षणाचाही विलंब न लावत गावडे म्हणाले, ""अहो, शरद पवारसाहेब यांच्याशिवाय तुम्हाला आता पर्याय नाही.'' त्यावर उपस्थितांनी टाळ्या वाजविल्या.

तर, शिवसेनेचे पुणे जिल्ह्याचे संपर्कप्रमुख सुरेश भोर यांनी, ""बाजार समितीचे माजी सभापती व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते ज्ञानेश्वर गेणभाऊ गावडे व उत्तम गावडे यांच्यात राजकीय विचाराचे मतभेद टोकाचे होते. त्यांच्यामध्ये झालेली जुगलबंदी सर्वांनीच पाहिलेली आहे. दावे प्रतीदाव्यांची लढाई पूर्ण झाल्यानंतर हे दोघे नेते एकत्र चहा घेऊन एकाच मोटारसायकलवरून घरी जात होते. नेहमी व्यक्तीदोष व सतत टीका करणाऱ्यांनी उत्तमराव यांचा आदर्श आत्मसात करावा,'' असा सल्ला दिल्यानंतर उपस्थितांमध्ये हशा पिकला. 

मंचर येथे अनसूया दगडू मुळे यांच्या दशक्रिया विधीत शिवसेनेचे सरपंच दत्ता गांजाळे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील व दिलीप वळसे पाटील यांच्या वतीनेच श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले, "गावकीत व भावकीत वाद करू नका. ती टिकून ठेवा. राजकारणात कुठलीही गोष्ट असंभव नाही, हे आता पहावयास मिळतंय. राजकारण आता बदलत चालले आहे.'' त्यानंतर श्रद्धांजली वाहताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते दत्ता थोरात यांच्यासह अनेकांनी आढळराव पाटील व वळसे पाटील यांचा आवर्जून उल्लेख केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com