गुणवत्तेऐवजी प्रतीकांभोवती कितीकाळ रमणार?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 जानेवारी 2019

‘ऑक्‍सफर्ड ऑफ द ईस्ट’ पुण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील शिक्षणाच्या दर्जाची आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याची चर्चा होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात वेशभूषेवर आणि पाहुण्यांना पगडी द्यावी की नको, या विषयावर वाद रंगतो आहे. पदवीप्रदान समारंभात विद्यार्थ्यांनी गाउनऐवजी झब्बा-कुर्ता परिधान करावा इथपासून ते पाहुण्यांचे स्वागत करताना पगडी द्यावी की नको, इथपर्यंतच्या अशैक्षणिक गोष्टींवर चर्चा होते आहे. फुले पगडी की पुणेरी पगडी या प्रतीकांच्या चर्चेत विद्यापीठातील शिक्षणाचा आणि तिथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा मुद्दा कुठेही चर्चेत नाही, हे वास्तव आहे.

सावित्रीबाई फुले यांचे नाव विद्यापीठाला दिले; पण महात्मा फुले यांचे प्रार्थनागीत म्हटले जात नाही, ते महाविद्यालयांनी प्रसारित केले पाहिजे. माणसाचा पुतळा उभा करायचा, नाव द्यायचं; पण विचारांना महत्त्व द्यायचं नाही, असं चाललंय. सांस्कृतिक प्रतीके पुढे रेटण्याची ही चढाओढ आहे. पुणेरी पगडी देऊ नये, या मागणीत काही गैर आहे, असे मला वाटत नाही.  
- डॉ. बाबा आढाव, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते

विद्यापीठाने कोणतीच पगडी देऊ नये. ब्राह्मणेतर म्हणतील महात्मा फुले यांची पगडी द्या, ब्राह्मण म्हणतील त्यांची पगडी द्या, गांधीवादी म्हणतील गांधी टोपी द्या. हा वाद वाढविण्यापेक्षा काहीच देऊ नये. विद्यापीठ हे शिक्षणासाठी आहे, तिथे शिक्षणाचाच विचार झाला पाहिजे.
- डॉ. रावसाहेब कसबे, ज्येष्ठ विचारवंत

पुणेरी पगडी कुठल्याही पक्ष, धर्माशी संबंधित नाही. ती पुण्याच्या सांस्कृतिक आणि विद्वत्तेचे प्रतीक आहे. राजकीय गदारोळामुळे लोक त्याला जातीशी जोडतात ही शोकांतिका आहे. विद्यापीठात कुण्याएका विचाराचे शिक्षण मिळत नाही. शिक्षण हे शिक्षण आहे. पण पगडीची परंपरा कायम ठेवावी.
- डॉ. सतीश देसाई, अध्यक्ष, पुण्यभूषण फाउंडेशन

पदवीप्रदान हा विद्यार्थ्यांचा सन्मान असतो. त्यांना वेश परिधान करताना अभिमान वाटला पाहिजे, असे निर्णय घेतले पाहिजेत. त्यासाठी विद्यार्थी, माजी विद्यार्थी, तज्ज्ञ यांना एकत्र आणून सर्वसहमतीने विचारपूर्वक निर्णय घेतला पाहिजे.    
- डॉ. वासुदेव गाडे, माजी कुलगुरू, पुणे विद्यापीठ

अत्यंत क्षुल्लक गोष्टीवरून माध्यमांनी पेटवलेला हा वाद आहे. विद्यार्थ्यांना कुणीही पगडी देत नाही आणि पुणेरी पगडी द्यावी की देऊ नये, याचा निर्णय कुलगुरूंनी घ्यायचा आहे. मला काही हा विषय चर्चेचा वाटत नाही.
- डॉ. नरेंद्र जाधव, माजी कुलगुरू, पुणे विद्यापीठ

पुणेरी पगडी आणि महात्मा फुले यांची पगडी दोन्ही पवित्र आहेत. एक ज्ञानाचे आणि समता अन्‌ नवज्ञानाचे प्रतीक आहे. पुण्यासारख्या सांस्कृतिक राजधानीत संगम झाला पाहिजे. यावरून शिक्षण क्षेत्रात वाद होऊ नयेत. पदवी प्रदान वर्षातून दोनवेळा होते. एकदा पुणेरी तर दुसऱ्यावेळी फुले पगडी द्यावी.
- रवींद्र वंजारवाडकर, महानगर संघचालक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

Web Title: discussion of Phule Pagadi Puneri Pagdi the savirtribai phule pune University