तडीपारी, मोकाचा प्रभावी वापर करणार

जनार्दन दांडगे
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

कायदा व सुव्यवस्थेला धोका पोचविणाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी तडीपारी व मोका या सारख्या कायद्यांचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सुरक्षित वातावरण निर्माण करण्यावर भर दिला जाईल, असे जिल्हा (ग्रामीण) पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले. जिल्ह्यातील विविध विषयांवर त्यांच्याशी केलेली ही चर्चा.

कायदा व सुव्यवस्थेला धोका पोचविणाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी तडीपारी व मोका या सारख्या कायद्यांचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सुरक्षित वातावरण निर्माण करण्यावर भर दिला जाईल, असे जिल्हा (ग्रामीण) पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले. जिल्ह्यातील विविध विषयांवर त्यांच्याशी केलेली ही चर्चा.

प्रश्न - जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून सूत्रे स्वीकारल्यानंतर कोणत्या 
गोष्टींना प्राधान्य असेल?

पाटील - सातारा जिल्हा हा पुणे जिल्ह्यालगत असल्याने येथील अनेक प्रश्नांची माहिती अगोदरच मिळालेली आहे. सातारा जिल्ह्याच्या तुलनेत पुणे जिल्ह्यात औद्योगिक वसाहती व महामार्गाची संख्या अधिक आहे.

यामुळे साहजिकच गुन्हेगारीचे प्रमाणही अधिक आहे. औद्योगिक वसाहतीमध्ये माथाडीवरून गुन्हेगारी वाढल्याची माहिती मिळाली आहे. दुसरीकडे इतर जिल्ह्याच्या तुलनेत पुणे जिल्ह्यात जमिनीचे दर अधिक असल्याने, लॅंड माफिया व खासगी सावकार मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत. जिल्ह्यातील सर्व पोलिस अधिकाऱ्यांना आपापल्या हद्दीतील माथाडी कामगार संघटना, त्यांचे म्होरके, वाळू व लॅंड माफिया, खासगी सावकार, लोकल दादा व त्यांच्या हालचालींची माहिती अधीक्षक कार्यालयाला तत्काळ देण्याच्या सूचना दिल्या आहेत. सातारा जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी मोका व तडीपारीचा उपयोग प्रभावी केला होता. तसाच प्रयोग पुणे जिल्ह्यातही करण्यात येणार आहे. गुन्हेगारी पूर्णपणे मोडून काढण्यासाठी शंभरहून अधिक मोक्‍याचे गुन्हे लावावे लागले तरी मागेपुढे पाहणार नाही. 

प्रश्न - नागरिक, पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संवाद वाढविण्यासाठी नेमके काय करणार आहात?
पाटील -
 जिल्ह्यात घडणारी प्रत्येक घटना अथवा बेकायदा कृत्य पोलिसांना समजावे यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात गोपनीय काम करणारे पोलिस कर्मचारी असतात. ते आपापल्या हद्दीत घडू पाहणाऱ्या व घडलेल्या प्रत्येक गोष्टीची माहिती पोलिस मुख्यालयातील विशेष शाखेला कळवत असतात. मात्र, चाकणमधील घटनेचा आढावा घेतल्यास, स्थानिक पोलिसांच्या गोपनीय शाखेने जिल्हा पोलिसांच्या जिल्हा विशेष शाखेला काहीही आगाऊ माहिती न दिल्याने हिंसाचाराची घटना रोखता आली नाही. यातून धडा घेत आगामी काळात प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घडणारी घटना व संभाव्य धोके कळावेत; म्हणून पोलिस ठाणेनिहाय वेगळी गुप्तचर यंत्रणा राबविणार आहे. या गुप्तचर यंत्रणेत काम करणारे पोलिस कर्मचारी थेट अधीक्षकांशी संवाद साधतील. त्यांचा पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांशी काहीही संबंध राहणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे. या यंत्रणेतील कर्मचाऱ्यांना पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडणाऱ्या प्रत्येक महत्त्वाच्या हालचालींची व गुन्ह्यांची माहिती अधीक्षकांना देणे बंधनकारक असणार आहे. यात महिला पोलिस कर्मचाऱ्यांचाही समावेश असणार आहे. 

प्रश्न - अवैध धंदे कसे रोखणार?
पाटील -
 जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्याच्या प्रभारी पोलिस अधिकाऱ्यांची बैठक येत्या काही दिवसांत बोलविण्यात येणार आहे. या बैठकीत अधिकाऱ्यांना आपापल्या हद्दीतील सर्व प्रकारचे अवैध धंदे व बेकायदा प्रवासी वाहतूक बंद करण्याची सूचना देण्यात येणार आहे. दुसरीकडे अवैध धंदे व बेकायदा प्रवासी वाहतूक, गुटखा विक्री यावर कारवाई करण्यासाठी अधीक्षक कार्यालयीन पातळीवर विशेष पथकाची निर्मिती करण्यात येणार आहे.

अधीक्षक कार्यालयाने नेमलेल्या गुप्तचर यंत्रणेकडून अथवा एखाद्या खासगी व्यक्तीकडून अवैध धंद्यांची माहिती मिळाल्यास संबंधित धंद्यांवर विशेष पथकाकडून कारवाई करण्यात येणार आहे. तसेच संबंधित बेकायदा धंदा ज्या पोलिस बिट अधिकाऱ्याच्या कक्षेत असेल, त्या अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. अवैध धंदे करणारे, तसेच त्यांना संरक्षण देणारे पोलिस कर्मचारी यांच्यावरही कडक कारवाई करण्यात येणार आहे. यात कोणालाही सूट दिली जाणार नाही, हे नक्की. 

प्रश्न - नगर व सोलापूर महामार्गावरील वाहतूक कोंडी कशी फोडणार?
पाटील -
 वाहतूक कोंडीच्या ठिकाणी इच्छा असूनही पुरेसे मनुष्यबळ देता येत नसल्याने वाहनचालकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी पोलिस व गृहरक्षक (होमगार्ड) दलाची सांगड घालण्यात येणार आहे. सध्या आठशे होमगार्ड उपलब्ध असून, येत्या काही काळात आणखी सातशे होमगार्डची भरती करण्यात येणार आहे. मोठे उद्योजक व औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांशी संपर्क साधून त्यांच्याकडूनही मनुष्यबळ उपलब्ध करून घेणार आहे. यामुळे वाहतूक कोंडीच्या ठिकाणी एक पोलिस व पाच वॉर्डन नेमण्यात येणार आहेत. नगर, नाशिकसह सर्वच महामार्गांवरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कठोर उपाय योजनाही राबविण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. 

प्रश्न - अपुऱ्या पोलिस बळाचे काय?
पाटील -
 पुणे जिल्ह्यातील नागरिक, कामाचा ताण लक्षात घेता पोलिस दलाकडे दीड हजार कर्मचारी कमी आहे. यातून मार्ग काढण्यासाठी सरकारकडे अधिक पोलिस बळाची मागणी करण्यात येणार आहे. पोलिस दलातील एकूण पोलिस कर्मचाऱ्यांच्या तीस टक्के महिला पोलिस कर्मचारी आहेत. तीस टक्के महिला कर्मचारी असतानाही, सध्या त्यांच्याकडे फारशी महत्त्वाची कामे सोपवली जात नाहीत. मात्र यापुढील काळात महिला पोलिसांनाही गुन्ह्याचा तपास, विशेष शाखेत सहभाग, तसेच बंदोबस्ताची कामे सोपवली जाणार आहेत. दुसरीकडे होमगार्डचा वापर जास्तीत जास्त करून, पोलिसांवरील कामाचा ताण कमी कसा करता येईल, याकडे लक्ष देण्यात येणार आहे. 

सातारा जिल्ह्यातील गुन्हेगारी व भाईगिरी मोडून काढण्यासाठी मोका कायद्याचा प्रभावी वापर केला होता. त्याप्रमाणे पुणे जिल्ह्यातील माफियागिरी मोडून काढण्यासाठी वेळ पडली तर शंभरहून अधिक टोळ्यांवर मोका लावण्यास मागेपुढे पाहणार नाही.
- संदीप पाटील, अधीक्षक, जिल्हा पोलिस, पुणे

Web Title: Discussion with Sandip Patil