भारतातील विद्यापीठांकडे प्रचंड क्षमता

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर बुधवारी (१८ मे) सेवानिवृत्त होत आहेत. या निमित्ताने त्यांच्याशी मीनाक्षी गुरव यांनी केलेला संवाद.
Dr. Nitin Karmalkar
Dr. Nitin KarmalkarSakal
Summary

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर बुधवारी (१८ मे) सेवानिवृत्त होत आहेत. या निमित्ताने त्यांच्याशी मीनाक्षी गुरव यांनी केलेला संवाद.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर बुधवारी (१८ मे) सेवानिवृत्त होत आहेत. या निमित्ताने गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात त्यांना आलेले अनुभव, विद्यापीठात घेतलेले नवे निर्णय, आलेली आव्हाने याविषयी त्यांच्याशी मीनाक्षी गुरव यांनी केलेला संवाद.

विद्यापीठात घेतलेल्या निर्णयांचे भविष्य

  • कुलगुरू पदावरील कार्यकाळात विद्यार्थी आणि विद्यापीठाचे हित लक्षात घेऊन, अनेक महत्त्वाचे उपक्रम, निर्णय.

  • सहकारी, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, विद्या परिषद सदस्य आणि अधिसभा सदस्यांनी पाठिंबा दिल्याने हे निर्णय प्रत्यक्षात उतरविणे शक्य. विद्यार्थी केंद्रबिंदू मानून विद्यापीठाने या काळात २० आंतरराष्ट्रीय आणि ९३ राष्ट्रीय स्तरावरील संस्था, विद्यापीठे यांच्यासमवेत सामंजस्य करार.

  • मागील काही वर्षांत ५८ पदवी अभ्यासक्रम, ४३ पदव्युत्तर अभ्यासक्रम आणि ६० हून अधिक प्रमाणपत्र आणि पदविका अभ्यासक्रम सुरू.

  • विद्यापीठाने ‘एसपीपीयू - रिसर्च पार्क फाउंडेशन’ या ना-नफा-ना-तोटा तत्त्वावर आधारित कंपनी कायद्यातील सेक्शन ८ अंतर्गत कंपनीची स्थापना. सेंटर फॉर इनोव्हेशन अँड इनक्युबेशन एंटरप्रायजेसमार्फत विद्यापीठातील नवोपक्रम आणि स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यात येत आहे.

  • विद्यापीठात समाजातील विविध घटकांतील नागरिकांचा सहभाग वाढावा यासाठी हेरिटेज वॉक, व्यंग्यचित्रकला संग्रहालय सुरू. त्याशिवाय विद्यापीठातील अपूर्ण राहिलेली बांधकामे या काळात पूर्ण.

  • सेंटर फॉर इंडस्ट्री ४.० माध्यमातून (C4i4 लॅब) लघु व मध्यम उद्योगांसाठी उपयुक्त ॲप्लिकेशन विकसित.

व्यवसायाभिमुख दृष्टिकोन

  • परदेशात विद्यापीठे औद्योगिक क्षेत्राशी जोडली आहेत. आपल्या देशातील सार्वजनिक विद्यापीठे मात्र चाकोरीबद्ध पद्धतीने काम करतात. तथापि, आपल्या विद्यापीठांकडे प्रचंड क्षमता आहे. त्याच उद्देशाने उद्योगक्षेत्रांशी सामंजस्य करार करत त्यांना विद्यापीठात सामावून घेण्याचा प्रयत्न.

  • यामध्ये होतकरू विद्यार्थ्यांमधून नवीन उद्योजक निर्माण व्हावेत, म्हणून ‘सीड फंड’ अंतर्गत निधी उपलब्ध करून दिला. तसेच ‘डिग्री प्लस’ व्यासपीठ तयार केले. त्यामार्फत विविध जागतिक दर्जाचे अभ्यासक्रम विद्यापीठातील आजी-माजी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले.

परदेशात ‘कॅम्पस’ असणारे पहिले विद्यापीठ

माइलस्टोन इंटरनॅशनल एज्युकेशन (कतार) यांच्या सहयोगाने विद्यापीठाने कतार येथे कॅम्पस सुरू केला आहे. सरकारी विद्यापीठांपैकी परदेशात कॅम्पस असणारे हे पहिले विद्यापीठ आहे, असे मला वाटते.

  • या ठिकाणी बीबीए, बी.एस्सी., बी.कॉम. आणि बी.ए. असे चार पदवी अभ्यासक्रम सुरू केले असून, यात १४ देशांतील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला.

  • देशातील अभिमत विद्यापीठे परदेशात कॅम्पस काढू शकतात. मग, सार्वजनिक विद्यापीठे का काढू शकत नाही, हे मनात होते. त्यातून हा कॅम्पस साकार झाला.

हे करायचं राहून गेलं

  • देशातील सर्व विद्यापीठे एका बाजूला आणि हे विद्यापीठ एका बाजूला असे माझे नेहमीच मत राहिले आहे. पुणे, नगर, नाशिक या तिन्ही जिल्ह्यांतील तसेच हजारांहून अधिक शैक्षणिक संस्थांची मांदियाळी हे विद्यापीठाचे वैभव आहे.

  • विद्यापीठासाठी खरंच खूप काही करायचे होते. परंतु, कुलगुरू म्हणून वेळ कमी पडल्याने काही कामं करायची राहून गेली. विद्यापीठातील अनेक विभागांमध्ये प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत. त्या तातडीने भरण्याची गरज आहे.

  • विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी दर्जेदार प्राध्यापक मिळविणे, हे विद्यापीठासमोरील आव्हान आहे. तसेच, त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञ, अभ्यासकांना ‘गेस्ट फॅकल्टी’ म्हणून आमंत्रित करणे, हादेखील चांगला पर्याय असू शकतो. - ‘ऑक्सिजन पार्क’ची संकल्पना राबवायची होती, परंतु त्याला विरोध झाल्याने तो प्रकल्प बारगळला.

  • विद्यार्थी अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून दुसऱ्या राज्यांत किंवा तेही शक्य नसेल, तर अगदी राज्यातील दुसऱ्या विद्यापीठांत जाऊन काही काळ (अभ्यासक्रमाचे एक सत्र, किंवा काही महिन्यांसाठी) अभ्यास करतील, अशी संकल्पना मांडली होती.

  • आगामी काळात येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थी तयार असले पाहिजेत, असे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावे, या दृष्टिकोनातून ही संकल्पना पुढे आली. मात्र, कार्यकाळ संपत आल्याने ते पूर्ण करणे शक्य झाले नाही.

पुढील प्रवास

पूर्वनियोजित काही संशोधन प्रकल्प सुरू आहेत, त्यावर पुढील काही वर्ष काम करेन. त्याशिवाय पीएच.डी.साठी काही विद्यार्थी आहेत, त्यांना मार्गदर्शन करत आहे. त्याव्यतिरिक्त डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था (अभिमत विद्यापीठ) यासाठी काम करणार आहे. डेक्कन कॉलेज ही राज्यातील सर्वांत जुनी शिक्षणसंस्था असून, तेथील पुरातत्त्वशास्त्र आणि भाषाशास्त्रातील संशोधनाला आणि अभ्यासक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी काय करता येईल, यावर काम सुरू आहे. त्याबाबत लवकरच पावले उचलली जातील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com