'नाट्य विद्यालयासाठी प्रयत्न करणार'

'नाट्य विद्यालयासाठी प्रयत्न करणार'

पुणे - नाट्य क्षेत्रातील कलावंत, पडद्यामागे काम करणाऱ्या कलाकारांना विम्याचे संरक्षण देण्याबरोबरच ग्रामीण भागातील हौशी नाट्य कलावंतांना प्रशिक्षित करण्यासाठी राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या (एनएसडी) धर्तीवर राज्य नाट्य विद्यालय सुरू करण्यासाठी राज्य सरकारकडे नाट्य परिषदेमार्फत पाठपुरावा केला जाणार आहे, असे परिषदेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी सांगितले.

पुणे शाखेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या १९ पदाधिकाऱ्यांनी आज ‘सकाळ’ कार्यालयास भेट दिली. या वेळी नाट्यक्षेत्र आणि कलाकारांसमोरील समस्या, त्यांचे व्यक्तिगत प्रश्‍न आदी विषयांवर चर्चा झाली. हे प्रश्‍न सोडविण्यासाठी परिषदेच्या माध्यमातून पुढाकार घेणार असल्याची ग्वाही सदस्यांनी दिली. राजेभोसले यांनी कलाकारांच्या वैद्यकीय प्रश्‍नांकडे लक्ष वेधताना त्यांना विमा संरक्षण देण्याचा मानस व्यक्त केला. या वेळी उपाध्यक्ष जयमाला इनामदार, दीपक रेगे, सुरेश देशमुख, रजनी भट, प्रकाश पायगुडे, विनोद खेडकर, अशोक जाधव, शेखर लोहकरे, प्रमोद रणनवरे, रेश्‍मा मुसळे, शोभा कुलकर्णी, अरुण पोमण, राजा राणा उपस्थित होते. 

पुण्यातील मोठ्या रुग्णालयांबरोबर चर्चा करून कलाकारांना सवलतीच्या दरात उपचार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे राजेभोसले यांनी सांगितले. हौशी कलाकार नाटक चळवळीत भाग घेतात. परंतु, त्यांना योग्य प्रशिक्षण मिळत नाही. त्यासाठी कार्यशाळा, बालकलाकारांसाठी प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन नाट्य परिषद करील, असेही त्यांनी सांगितले. 

नाट्यगृहे ही राजकीय पक्षांच्या कार्यक्रमांसाठी दिली जातात. त्याचा नाट्य क्षेत्रावर विपरीत परिणाम होत असल्याची चिंता काही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. याबद्दल सुरेश देशमुख म्हणाले, ‘‘नाट्यगृहांमध्ये कोणते कार्यक्रम करावे, याबद्दल नियमावली तयार केली आहे. त्याचे काटेकोरपालन केल्यास हे प्रश्‍न निर्माण होणार नाहीत. नाट्यगृहांना घरगुती दराने वीज उपलब्ध केल्यास देखभालीच्या खर्चाचा प्रश्‍न सुटेल.’’

कार्यालयासाठी  हवी जागा
नाट्य परिषदेच्या कार्यालयासाठी मालकीची जागा नाही. ती देण्याबरोबरच महापालिकेने नाटकांच्या रंगीत तालमींसाठी छोटे सभागृह वा छोटे नाट्यगृह द्यावे. यातून नाट्य क्षेत्राला अधिक चालना मिळेल, अशी अपेक्षा मेघराज राजेभोसले यांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com