शीघ्र प्रतिसाद पथके रोखणार साथीचे आजार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जून 2018

पुणे - पावसाळ्यात उद्‌भविणारे जलजन्य आणि कीटकजन्य आजार रोखण्यासाठी जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. पाणी उकळून व गाळून पिणे, कोरडा दिवस पाळणे, परिसर स्वच्छ ठेवणे, डास उत्पत्तीची स्थाने नष्ट करणे, यांसारख्या खबरदारीच्या उपाययोजना आतापासून कराव्यात, असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांनी केले आहे. 

पुणे - पावसाळ्यात उद्‌भविणारे जलजन्य आणि कीटकजन्य आजार रोखण्यासाठी जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. पाणी उकळून व गाळून पिणे, कोरडा दिवस पाळणे, परिसर स्वच्छ ठेवणे, डास उत्पत्तीची स्थाने नष्ट करणे, यांसारख्या खबरदारीच्या उपाययोजना आतापासून कराव्यात, असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांनी केले आहे. 

जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने जिल्हास्तरावर दोन शीघ्र प्रतिसाद पथकांची (रॅपिड रिपॉन्स टीम) स्थापना करण्यात आली आहे. यापैकी एक पथक हे जलजन्य आणि दुसरे कीटकजन्य आजारांच्या प्रतिबंधासाठी आहे. याशिवाय पावसाळ्यात जिल्ह्यातील ग्रामस्थांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने आतापासूनच गावागावांत जनजागृती करण्यात येत असल्याचेही डॉ. माने यांनी सांगितले. 

ते म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील संभाव्य साथरोग नियंत्रणासाठी आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना पुरेसा औषधसाठा उपलब्ध करून दिला आहे. जिल्हा, तालुका आणि प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर प्रत्येकी एका नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. येत्या १५ जूनपासून ११० नियंत्रण कक्ष कार्यान्वित होणार आहेत. याशिवाय नदीकाठी असलेली ८४ बाधित गावे आणि पुराचा धोका असलेली पाच गावे अशा ८९ गावांसाठी विशेष खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. या गावांची यादी सर्व तालुका वैद्यकीय अधिकारी आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांना पाठविली आहे.’’ 

जलजन्य आजारांची साथ ही दूषित पाण्यामुळे, तर कीटकजन्य आजारांची साथ डासांमुळे उद्‌भविते. त्यामुळे साथीचा उद्‌भव रोखण्यासाठी पिण्यासाठी शुद्ध पाण्याचा वापर करणे आणि डासाची उत्पत्ती होणार नाही, याची खबरदारी घेणे, गरजेचे आहे.

ही काळजी घ्यावी
    आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळावा. 
    कोरड्या दिवशी सर्व पाणीसाठे (उदा. रांजण, कोथळी, माठ, गावातील पाण्याची डबकी) नष्ट करावेत. 
    गावातील रस्त्यांमध्ये पडलेल्या नारळाच्या रिकाम्या करवंट्या, ट्यूब, टायर जाळून टाकावेत. 
    डास उत्पत्तीच्या स्थाने नष्ट करावीत किंवा त्यात गप्पी मासे सोडावेत. 
    वैयक्तिक संरक्षणासाठी मच्छरदाणी किंवा डासांना पळविणाऱ्या अगरबत्तीचा वापर करावा.
    पावसाळ्यातील गढूळ पाणी उकळून व गाळून प्यावे.
    पाणी शुद्धीकरण करणाऱ्या औषधांचा वापर करावा. 
 कोणत्याही आजाराची लक्षणे दिसताच, त्वरित जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी जावे.

शीघ्र प्रतिसाद पथकांचे संपर्क क्रमांक 
    जलजन्य आजार - डॉ. पी. बी. जोशी (जिल्हा साथरोग वैद्यकीय अधिकारी) - ९२२६८८००५१ किंवा ९५२७६६२६१४
    कीटकजन्य आजार - डॉ. ए. एस. बेंद्रे (जिल्हा हिवताप अधिकारी) -  ९९२३२२२९५०
 

Web Title: disease sickness health rainy season