देणाऱ्यांचे हात हजारो...!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 जुलै 2018

पुणे - हरपलेलं पितृछत्र... पोरा-बाळासाठी मोलमजुरी करणारी आई... अन्‌ परिस्थिती नसल्याने तिच्या घरापर्यंत न पोचलेली वीज... अशा परिस्थितीत शिक्षणासाठी धडपडणारी अस्मिता जाधव. पोटाची भूक पाण्यावर भागविणारी कोमल रेगुडे. या दोघींसह प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शिक्षणासाठी वणवण करणारे विद्यार्थी आणि त्यांच्या शैक्षणिक जबाबदारीचा आर्थिक भार पेलणारे दाते, अशा दोन हातामधलं अंतर शिष्यवृत्ती वाटपाच्या कार्यक्रमानिमित्त कमी झाले.

पुणे - हरपलेलं पितृछत्र... पोरा-बाळासाठी मोलमजुरी करणारी आई... अन्‌ परिस्थिती नसल्याने तिच्या घरापर्यंत न पोचलेली वीज... अशा परिस्थितीत शिक्षणासाठी धडपडणारी अस्मिता जाधव. पोटाची भूक पाण्यावर भागविणारी कोमल रेगुडे. या दोघींसह प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शिक्षणासाठी वणवण करणारे विद्यार्थी आणि त्यांच्या शैक्षणिक जबाबदारीचा आर्थिक भार पेलणारे दाते, अशा दोन हातामधलं अंतर शिष्यवृत्ती वाटपाच्या कार्यक्रमानिमित्त कमी झाले.

दिशा परिवार चॅरिटेबल ट्रस्टतर्फे राज्यातील गरजू आणि गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी दात्यांच्या माध्यमातून रविवारी शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले. ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार, धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे, नोंदणी महानिरीक्षक अनिल कवडे, सामाजिक कार्यकर्त्या साधना झाडबुके, ट्रस्टचे अध्यक्ष माणिकराव गोते, संस्थेचे मार्गदर्शक भाऊसाहेब जाधव, संस्थेची शिष्यवृत्ती प्रधान समिती अध्यक्ष नंदकिशोर रोजेकर, कार्याध्यक्ष राजाभाऊ चव्हाण या वेळी उपस्थित होते. 

मारुती मंदिरात भरलेली इयत्ता पहिलीची शाळा ते ‘बीट्‌स पिलानी’मध्ये घेतलेले उच्च शिक्षण, असा प्रवास उलगडत पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘‘आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला तोंड द्यावे, स्वत:चे निर्णय स्वत: घ्यावे, संवेदना जागृत ठेवून जगावे, असे संस्कार लहानपणापासून मनावर बिंबवले गेले. त्यामुळे आयुष्यात येणारी आव्हाने स्वीकारत गेलो. चांगले, निरपेक्षपणे व कष्टाने काम केले, तर कोणाकडेही काही मागायची गरज भासत नाही. सतत प्रयत्न करत राहिल्यास खडतर प्रवासातूनही आयुष्य उभे करता येते.’’

डिगे म्हणाले,  ‘‘गुणवत्ता असूनही केवळ आर्थिक परिस्थितीमुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. त्यांना शैक्षणिक मदत मिळावी म्हणून राज्यातील गणेश मंडळांना हाक दिली आणि त्यातून गेल्या वर्षी साडेसात कोटी रुपयांचा निधी जमा झाला. तसेच, अनेक संस्था, गणेश मंडळे गरजू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व घेण्यासाठी पुढाकार घेत आहेत. याची जाणीव ठेवत विद्यार्थ्यांनी देशासाठी काम केले पाहिजे. ’’

कवडे  म्हणाले, ‘‘आजूबाजूला निराशाजनक घटना घडत असताना सद्‌भावना पेरताना खरा आनंद मिळतो. देशाच्या निर्मितीसाठी चांगला विचार, मूल्ये मांडणारे मनुष्यबळ हवे आहे. त्यासाठी शिक्षणाचा पायाही भक्कम असायला हवा.’’ प्रास्ताविक गोते यांनी केले, तर सूत्रसंचालन चव्हाण यांनी केले.

‘दिशा परिवाराच्या उपक्रमास मदत करा’
दिशा परिवारातर्फे गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे, यासाठी त्यांचे शैक्षणिक पालकत्व घेणारे दाते शोधण्याचे काम केले जाते. दात्यांच्या हस्ते थेट आर्थिक मदतीचा धनादेश विद्यार्थ्यांना दिला जातो. त्यामुळे परिवाराच्या या उपक्रमाला समाजाने मदत करावी, असे आवाहन सर्व वक्‍त्यांनी आपल्या भाषणात केले.

Web Title: Disha pariwar Charitable Trust Scholarship distribution