कार्यकर्त्यांच्या झोंबी नंतर आजी- माजी आमदारही एकमेकांना भिडले

नितीन बारवकर
Friday, 4 September 2020

राष्ट्रवादी कॉंग्रेस व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांत "सोशल वॉर' रंगले आहे. काल या विषयावरून कार्यकर्त्यांत तु तु मै मै झाल्यानंतर आज आमदार अशोक पवार व माजी आमदार बाबूराव पाचर्णे हेही एकमेकांना भिडले.

शिरूर (पुणे) : शिरूर येथील ग्रामीण रूग्णालयात आठ दिवसांपासून धूळ खात पडलेले व्हेंटिलेटर हे ऑपरेटर, इतर सुविधा व सुट्या भागांमुळे कूचकामी ठरले असताना त्यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेस व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांत "सोशल वॉर' रंगले आहे. काल या विषयावरून कार्यकर्त्यांत तु तु मै मै झाल्यानंतर आज आमदार अशोक पवार व माजी आमदार बाबूराव पाचर्णे हेही एकमेकांना भिडले. यात आमदार निधीचा गैरवापर झाल्याचा पाचर्णे यांचा आरोप पवार यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळला. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अशोक पवार यांनी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आमदार निधीतून आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी मास्क व पीपीई किटबरोबरच ईसीजी मशिन, ऑक्‍सिजन सिलिंडर, बेड, पल्स ऑक्‍सिमीटर, ऑक्‍सिजन कॉन्सेन्टेटर, इन्फ्रारेड थर्मामीटर आदी साधनसामग्री उपलब्ध करून दिली होती. शिरूर व हवेलीतील प्राथमिक आरोग्य केंद्रांत या साहित्याचे वाटप केले. त्यात तीन व्हेंटिलेटर आमदार निधीतून दिल्याची पोस्ट राष्ट्रवादीच्या सोशल मिडीया सेलवरून व्हायरल झाली. त्याला भाजप उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे यांनी आक्षेप घेतला व आमदारांनी दिलेले व्हेंटिलेटर गायब, आमदार निधीचा गैरवापर अशा पोस्टसह सोशल मिडीयावर रान उठवले. त्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतप्त झाले. पक्षाचे तालुकाध्यक्ष रवीबापू काळे यांनी पोलिसांकडे तक्रार देत पाचंगे यांच्यावर कारवाईची मागणी केली. यावर पाचंगे यांना पोलिस स्टेशनला बोलावले असता भाजप पदाधिकाऱ्यांनीही तेथे धाव घेत आमदार निधीच्या चौकशीची मागणी केली. 

पुणे विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेबाबत घेतला मोठा निर्णय

पदाधिकारी व कार्यकर्त्यांमधील राजकीय वाद चिघळत असताना माजी आमदार पाचर्णे यांनीही आज आमदार पवार यांच्यावर निशाणा साधला. व्हेंटिलेटर दिल्याचे अशोक पवार सांगतात, तर तालुका आरोग्य अधिकारी ते नाकारतात. यातून आमदारांचा खोटारडेपणा सिद्ध होत असून, प्रसिद्धीच्या हव्यासापायी त्यांचा हा खटाटोप चालू असल्याचा आरोप त्यांनी केला. आमदार निधी हा वाटेल तसा खर्चायला कुणाच्या मालकीचा नसून, तो जनतेचा पैसा आहे. त्याचा जाब विचारण्याचा आणि हिशेब मागण्याचा अधिकार जनतेला आहे. त्यामुळे आमदारांनी अनाठायी खर्च केला असेल, तर त्याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी करताना चौकशी न झाल्यास आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला. 

पुण्यात न्यायालयीन कामकाज 15 सप्टेंबरपर्यंत एकाच शिफ्टमध्ये

इतके दिवस गायब असलेले पाचर्णे बोलले म्हणजे ते कोरोनाच्या मैदानात उतरल्याचा आनंद असल्याची कोपरखळी आमदार पवार यांनी लगावली. आम्ही जीव धोक्‍यात घालून वीस हजार परप्रांतीयांना त्यांच्या प्रांतात पाठविले, तालुका पातळीवर कोरोनाचे रूग्ण घेत नव्हते ते घेण्यासाठी पाठपुरावा केला. कठीण काळातही सरकार दरबारी चकरा मारल्या. तेव्हा पाचर्णे कुठेच दिसले नाहीत. प्राप्त परिस्थिती गंभीर असून, अशावेळी राजकारण करण्यापेक्षा एकमेकांशी समन्वयाने काम करू, असा सबुरीचा सल्लाही त्यांनी दिला. आरोग्य विभागाने ज्या साहित्याची मागणी केली ते देण्याचा कसोशीने प्रयत्न केला असून, त्या साहित्याचा योग्य वापर व विनियोग होत आहे. हा सगळा व्यवहार पारदर्शी असून, पाचर्णे यांनी कधीही येऊन तपासावा, असे आव्हानही त्यांनी दिले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dispute between Shirur MLA Ashok Pawar and former MLA Baburao Pacharne