शेवाळेवाडीत रस्त्यावरून वाद

Road
Road

मांजरी - येथील ग्रॅण्ड बे गृहप्रकल्पातून शेवाळेवाडी गावात जाणारा रस्ता बांधकाम व्यवसायिकाने भिंत घालून बंद केल्याने परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पीएमआरडीएने हा रस्ता खुला करण्याचा आदेश देऊनही अद्याप तो खुला करण्यात आलेला नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीने विशेष ग्रामसभा बोलावून हा रस्ता खुला करण्याचा ठराव केला आहे.

शेवाळेवाडीची लोकसंख्या पंचवीस हजारांच्या वर आहे. सध्या शेवाळेवाडीत जाणारा मुख्य रस्ता अपुरा व गजबजलेला आहे. त्यामुळे येथे वारंवार वाहतूक कोंडी व त्यामुळे वारंवार छोटे-मोठे अपघात होतात. त्यासाठी ग्रॅण्ड बे गृहप्रकल्पातून जाणारा रस्ता चांगला पर्याय असून, येथून वाहतूक सुरू झाल्यास दोन्ही रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण कमी होईल. मात्र कायदेशीर आदेश असतानाही संबंधित बांधकाम व्यवसायिकाने भिंत घालून बंद केला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे याबाबत तक्रार केली होती. प्राधिकरणाने त्याची दखल घेऊन ही भिंत पाडून रस्ता खुला करण्याचा आदेश व्यवसायिकास दिला आहे. मात्र दोन महिने होत आले असतानही त्याने त्याकडे दुर्लक्ष केले आहे.

ग्रामसभेत ठराव
ग्रामस्थांनी नुकतीच विशेष ग्रामसभा घेऊन सोसायटीतील रस्ता शेवाळेवाडी ग्रामस्थांसाठी येत्या दोन दिवसांत खुला करून देण्याची मागणी केली आहे, अन्यथा भिंत घालून आडवलेला रस्ता ग्रामस्थ खुला करतील, असा ठराव केला आहे. सरपंच अशोक शिंदे, उपसरपंच सुवर्णा कोद्रे, विक्रम शेवाळे, संजय शेवाळे, अशोक शेवाळे, सचिन शेवाळे, रामभाऊ अक्काले, श्रीनिवास शेवाळे, वसंत शेवाळे, भारती शेवाळे उपस्थित होते.

गृहप्रकल्पातील रस्ता व खुली जागा जर सोसायटीने देखभाल केली नाही, तरच प्राधिकरणाच्या ताब्यात द्यावी लागते. मात्र ग्रॅण्ड बे गृहप्रकल्पातील सात बिल्डिंगमध्ये सोसायटी असून, या जागेची देखभालही तेच करीत आहेत. त्यामुळे येथील रस्ता खुला करता येणार नाही.
- ॲड. विजय महाडिक, कायदेशीर सल्लागार, ग्रॅण्ड बे गृहप्रकल्प

ग्रॅण्ड बे सोसायटीच्या समोरील रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा, यासाठी जुलै महिन्यात ग्रामसभा घेऊन ठराव करण्यात आला. त्यानंतर पीएमआरडीएला हा ठराव देण्यात आला. त्यावर पीएमआरडीएने सप्टेंबरमध्ये विकसकाला हा रस्ता खुला करण्याबाबत पत्र पाठविले होते. २६ ऑक्‍टोबरला विशेष ग्रामसभा घेऊन रस्ता दोन दिवसांत खुला करून देण्याची मागणी पीएमआरडीएकडे केली आहे.
- संजय शेवाळे, ग्रामस्थ, शेवाळेवाडी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com