पोस्टरबाजीवरुन भाजपची खिल्ली आणि राष्ट्रवादीचं हसू

ज्ञानेश सावंत 
सोमवार, 29 जुलै 2019

- सत्ताधारी भारतीय जनता पक्षातील पक्षांतराची खिल्ली उडवताना राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्याच पक्षाचे हसू करून घेतल्याचेही फलकावरील आशयातून स्पष्ट आहे
- 'भाजपातील प्रवेशासाठी भ्रष्टाचारी आणि सहकार बुडविल्याचा अनुभव हवा, अशी अट असल्याचा टोला राष्ट्रवादीने हाणला
- भाजपमध्ये प्रवेश करणारी नेते मंडळी ही राष्ट्रवादीचीच आहेत,

पुणे : सत्ताधारी भारतीय जनता पक्षातील पक्षांतराची खिल्ली उडवताना राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्याच पक्षाचे हसू करून घेतल्याचेही फलकावरील आशयातून स्पष्ट आहे. "भाजपातील प्रवेशासाठी भ्रष्टाचारी आणि सहकार बुडविल्याचा अनुभव हवा, अशी अट असल्याचा टोला राष्ट्रवादीने हाणला खरा; पण भाजपमध्ये प्रवेश करणारी नेते मंडळी ही राष्ट्रवादीचीच आहेत, मग, याच नेत्यांनी सहकार बुडविले का ? त्यांनीच भ्रष्टाचार केला का ? अशा प्रश्‍नांची सरबत्ती यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसवर केली जात आहे. 
bjp
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये अन्य पक्षांतील नेते प्रवेश करीत आहेत. विशेषत : राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पाडण्याचा बेत आखून भाजपच्या नेत्यांनी या पक्षातील नेत्यांना प्राधान्य दिल्याचे दिसत आहे. तपास यंत्रणांचा धाक दाखवून विरोधकांना पक्षांतर करण्यास भाग पडले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नुकताच केला. त्यानंतर आणखी काही नेते भाजपमध्ये येण्यास उत्सुक असल्याचे भाजप नेते बोलून दाखवत आहेत. तेव्हाच, हडपसरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक योगेश ससाणे यांनी "भाजपात प्रवेश देणे आहे,' या आशयाचा फलक उभारून भाजपची खिल्ली उडविली आहे. त्याची चर्चाही राजकीय क्षेत्रात आहे. 

मात्र, या फलकावर भाजप प्रवेशाच्या अटीही दिल्या आहेत. त्यात 'ईडी व 'इन्कम टॅक्‍स'ची नोटिस असलेल्यांना भाजपात प्राधान्य असेल. 'भ्रष्टाचाराचा आणि सहकार क्षेत्र बुडविल्याचा अनुभव हवा, असेही फलकावर नमूद केले आहे. म्हणजे, भाजपमध्ये गेलेले आणि प्रवेश करू इच्छिणारे नेते हे भ्रष्ट आहेत, त्यांनीच सहकार बुडविला आहे. त्यांच्या 'उद्योगां'मुळे 'ईडी' आणि 'इन्कम टॅक्‍स'च्या धाडी पडत आहेत, असा अर्थ आता राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते काढत आहेत. 

अशा प्रकारे 'फ्लेक्‍सबाजी' करणारे ससाणे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले आहेत. त्यांचे वडील दत्तोबा ससाणे हेही दोनदा नगरसेवक होते. विशेष म्हणजे, दत्तोबा ससाणे आणि योगेश हे 2014 च्या विधनासभा निवडणुकीनंतर भाजपवासी झाले. त्यानंतर महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीआधी योगेश यांनी करीत आपल्या मनागटावर घड्याळ बांधले. नगरसेवक झाल्यापासून ससाणे हे ऊठसूठ भाजपविरोधात आंदोलन करतात. आपल्या 'हटके स्टाइल'ने आंदोलने करीत ससाणे नेहमीच चर्चेत राहतात. मात्र, आता योगेश यांनी केलेली भाजपविरोधी 'फ्लेक्‍सबाजी' राष्ट्रवादीच्याच अंगलाट आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: disputes between Bjp and Ncp due to poster