‘दूरशिक्षण’चे प्रवेश २७ पासून

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

अद्याप शुल्क निश्‍चित नाही
बहिःस्थ अभ्यासक्रम सुरू असताना त्याचे शुल्क अल्प प्रमाणात होते. मात्र, दूरशिक्षण पद्धतीत हे शुल्क किती असेल, याबद्दल पोर्टलवर कोणतीच माहिती नाही. विद्यापीठाकडून अभ्यास साहित्य दिले जाणार आहे. तसेच, संपर्क तास होणार आहेत. त्यामुळे शुल्कवाढ होणाची शक्‍यता आहे. मात्र, शुल्क अवाजवी आकारल्यास त्यास विद्यार्थी संघटनांकडून विरोध होण्याचीही चिन्हे आहेत.

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने बहिःस्थ अभ्यासक्रमाचे प्रथम वर्षाचे प्रवेश बंद केले आहेत. हे अभ्यासक्रम दूरशिक्षण पद्धतीने (डिस्टन्स लर्निंग) चालविले जाणार आहेत. त्याची प्रवेश प्रक्रिया २७ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. त्यासाठी ‘स्कूल ऑफ ओपन लर्निंग’ हे पोर्टल सुरू करण्यात आले असून, त्यावर संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

बहिःस्थ शिक्षणाच्या माध्यमातून कला, वाणिज्य शाखेचे पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम चालविले जात होते. या अभ्यासक्रमांना प्रवेश घेणारे विद्यार्थी थेट परीक्षा देत होते. विद्यापीठाने आता दूरशिक्षण पद्धत सुरू केल्याने या अभ्यासक्रमांना ‘चॉइस बेस्ड क्रेडिट सिस्टीम’ लागू करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना संपर्क तास पूर्ण करावे लागणार आहेत. याशिवाय, या अभ्यासक्रमांसाठी विद्यापीठाकडून अभ्यास साहित्यदेखील दिले जाणार आहे.

दूरशिक्षणाची प्रवेश प्रक्रिया १६ ऑगस्टपासून सुरू होणार होती. ही तारीख जाहीर करूनही विद्यापीठाला प्रवेश प्रक्रिया सुरू करता आली नाही. आता २७ ऑगस्टपासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे. ही प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. विद्यापीठाच्या मूळ संकेतस्थळावर गेल्यावर होम पेजवर ‘स्कूल ऑफ ओपन लर्निंग’ पोर्टलची लिंक दिलेली आहे. त्यावर नियोजित वेळापत्रक पाहायला मिळते.

बीए, बीकॉम, एमए, एमकॉम आणि एमबीए या अभ्यासक्रमांचे वेळापत्रक यात दिलेले आहे. सर्व अभ्यासक्रमांची प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया २७ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांना ३० सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन प्रवेश अर्ज भरता येतील. अभ्यास साहित्य कधी आणि कुठे मिळणार, याबाबत मात्र कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. याबद्दल लवकर माहिती दिली जाईल, असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Distance Learning Admission Savitribai Phule University