मुझे जाने दो, मुझे टेररिस्ट को खतम करना है 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 एप्रिल 2017

पुणे - ""नागरगोट्यात जवानांच्या घरांवर दहशतवाद्यांनी अचानक हल्ला केला. तेव्हा घरी असलेले शहीद मेजर कुणाल गोसावी क्षणार्धात गणवेश चढवून घराबाहेर पडले. एकीकडे "एके 47'च्या गोळ्यांचा मारा सुरू असतानाही त्यांनी जवानांच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी पोचविले. आता ते आपल्या "क्‍यूआरटी टीम'कडे वळले. तेवढ्यात एक गोळी त्यांना लागली. त्यांची शुद्ध हरपत होती, त्या वेळी त्यांच्या तोंडी एकच वाक्‍य होते, "मुझे जाने दो, मुझे टेररिस्ट को खतम करना है,' '' हा प्रसंग लेफ्टनंट कर्नल ओंकार बापट उभा करत असतानाच उपस्थितांचे डोळे पाणावले, पण तितक्‍याच स्फूर्तीने "भारत माता की जय'चा जयघोषही झाला. 

बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेने आयोजित केलेल्या माजी विद्यार्थी मेळाव्यात पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते शहीद मेजर गोसावी यांना "बीएमसीसी भूषण' पुरस्काराने गौरविण्यात आले. वीरपत्नी उमा गोसावी, तसेच त्यांच्या आई व वडिलांनी हा पुरस्कार स्वीकारला. या वेळी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे किरण शाळिग्राम, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावळ, संघटनेचे कार्याध्यक्ष अरुण निम्हण, सचिव युवराज शहा उपस्थित होते. ऍड. भास्करराव आव्हाड यांनाही "बीएमसीसी भूषण' पुरस्कार देण्यात आला. तर, पहिला "शहीद मेजर कुणाल गोसावी पुरस्कार' ओंकार बापट यांना देण्यात आला. शिक्षणतज्ज्ञ डॉ. प्र. चिं. शेजवलकर व प्राचार्य डॉ. चि. ग. वैद्य यांना "बीएमसीसी गुरुवर्य पुरस्कार'ने सन्मानित करण्यात आले. याबरोबरच गंधार संगोराम (संगीत), निपुण धर्माधिकारी (नाट्य), विद्याधर कुलकर्णी (पत्रकारिता), नितीन कीर्तने, योगेश धाडवे, सुनील गुदगे (क्रीडा) व धन्यकुमार चोरडिया (व्यापार) यांना पुरस्कार देण्यात आला. 

"बीएमसीसी'चे माजी विद्यार्थी असलेल्या मेजर गोसावी यांच्याविषयी ओंकार बापट म्हणाले, ""गोसावी त्यांच्या कुटुंबात नाहीत; पण त्यांच्यामुळे अनेकांची कुटुंबे वाचली.'' उमा गोसावी यांनीही गोसावी यांच्या "बीएमसीसी'मधील आठवणींना साश्रू नयनांनी उजाळा दिला. 

ऍड. आव्हाड म्हणाले, ""बीएमसीसी माझे कुटुंब आहे. माझे आयुष्य घडविण्याचे श्रेय डॉ. शेजवलकर व डॉ. वैद्य यांनाच जाते. या पुरस्काराने महाविद्यालयासाठी काम करण्याची जबाबदारी वाढली. बीएमसीसी हे संस्कारक्षम विद्यार्थी घडविणारे महाविद्यालय आहे.'' 

"विद्यार्थ्यांनी दिलेला पुरस्कार, माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठा आनंद आहे,' अशी भावना डॉ. वैद्य यांनी व्यक्त केली. 

बापट म्हणाले, ""महाराष्ट्राला सगळ्याच क्षेत्रांत मोठ्या व्यक्ती देण्याचे काम "बीएमसीसी'ने केले. महाराष्ट्राच्या प्रगतीत महाविद्यालयाचा मोठा वाटा आहे.'' संघटनेला बापट यांनी स्वतः देणगी देत मोठा निधी जमवून देण्याचेही काम केले. 

शेजवलकर यांची खंत 
""बॅंका, कंपन्यांमध्ये जाण्यापेक्षा मला शिक्षक होणे पसंत होते. विद्यार्थी माझे दैवत असून, त्यांची सेवा करण्याचे काम केले,'' असे सांगत, "साहित्यात रस होता, साहित्याचेही व्यवस्थापन व्हावे, ही अपेक्षा होती. त्यामुळेच महाराष्ट्र साहित्य परिषदेत गेलो. पण, दुर्दैवाने ते झाले नाही.' अशी खंत डॉ. शेजवलकर यांनी व्यक्त केली. 

Web Title: Distribution of BMCC Bhushan Award