मतदारांना खोट्या नोटांचे वाटप?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017

पिंपरी - रहाटणीतील एका सराफाकडे दोन हजार रुपयांच्या नोटा काही महिला घेऊन आल्या होत्या. मात्र, त्या खेळण्यातील असल्याचे समजताच त्या तावातावाने निघून गेल्या. काही जणांनी मतदारांना या नोटा वाटल्याचे समजते.

पिंपरी - रहाटणीतील एका सराफाकडे दोन हजार रुपयांच्या नोटा काही महिला घेऊन आल्या होत्या. मात्र, त्या खेळण्यातील असल्याचे समजताच त्या तावातावाने निघून गेल्या. काही जणांनी मतदारांना या नोटा वाटल्याचे समजते.

रहाटणीतील शहाणे ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. मंगळवारी (ता.१४) रात्री पूजा गायकवाड या एका महिलेसह सराफाला पैसे देण्यासाठी आल्या. सराफाने त्या नोटांचे फोटो काढून घेतले व ‘या नोटा तुम्हाला कोणी दिल्या’, अशी विचारणा केली. ‘दिल्यात कुणीतरी’, असे उत्तर देऊन त्यांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, या नोटा खेळण्यातील असल्याचे सांगितल्यावर सराफाच्या हातातून रागाने नोटा हिसकावून त्या परत गेल्या. 

दोन हजार रुपयांच्या नोटेसारख्या हुबेहूब दिसणाऱ्या या नोटांवर महात्मा गांधीजींचे छायाचित्र असून, शून्य-शून्य अशी सीरिज टाकण्यात आली आहे. याशिवाय नोटांवर चिल्ड्रन बॅंक ऑफ इंडिया, असे लिहिण्यात आले आहे. 

हातावरचे पोट असणाऱ्या गोरगरीब जनतेकडे अद्याप चलनातील ही खरी नोट आलेली नसल्यामुळे खरी आणि खोटी नोट यांच्यातील फरक त्यांना समजून येण्याची शक्‍यता नाही. याचाच गैरफायदा या निवडणुकीत समाजकंटक घेण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. याबाबत कोणतीही तक्रार वाकड पोलिस ठाण्यात दाखल झालेली नाही.

Web Title: Distribution of false currency voters