गोड खाऊ आणि पाटी-पेन्शिलमुळे झोपडीमधील मुले भारावली

गोड खाऊ आणि पाटी-पेन्शिलमुळे झोपडीमधील मुले भारावली

नारायणगाव : शाळा व शिक्षणापासून कोसो मैल दूर असणाऱ्या गरीब कुटुंबातील शाळाबाह्य मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने येथील डॉ. स्मिता संदीप डोळे यांनी शेतमजूरांच्या पंचवीस मुलांच्या हातात पाटी, पेन्सिल व हस्ताक्षर पुस्तिका दिली. गुढी पाडव्याच्या महूर्तावर या मुलांना खाऊ वाटप करून पाटीवर हस्ताक्षर गिरवण्याचे धडे दिले. या माध्यमातून डॉ. डोळे यांनी गुढी उभारू ज्ञान दानाची हा संदेश दिला. येथील पुणे-नाशिक महामार्गालगत असलेल्या शॅम्पेन इंडेज कंपनी (चौदा नंबर) परिसरात उभारलेल्या झोपड्यात शेतमजूर कुटुंब राहतात. शेतमजूरी व मिळेल ते काम करून ही कुटुंबे आपला उदरनिर्वाह करतात. या ठिकाणी काही परप्रांतीय शेतमजूर सुध्दा तीन चार वर्षांपासून  वास्तव्यास आहेत. या वसाहतीत शेतमजुरांची तीन ते दहा वयोगटातील मुले आहेत. पालक रोजंदारीवर गेल्या नंतर ही मुले दिवसभर उन्हातान्हात फिरत असतात. जवळपास शाळा अथवा अंगणवाडी नसल्याने या मुलांना शाळा हा शब्दच माहीत नाही.

मुलांना शाळेत घातले तर रोजीरोटीची भ्रांत असलेल्या पालकांपुढे मुलांची ने आण कोण करणार असा प्रश्न आहे. या मूळे ही मुले  शाळाबाह्य आहेत. एकविसाव्या शातकाकडे वाटचाल करणाऱ्या भारतात अक्षरओळख नसणारी मुले आहेत. या प्रश्नामूळे डॉ. स्मिता डोळे या अस्वस्थ आहेत. हे चित्र बदलायला हवे हा विचार सतत त्यांच्या मनात घोळत आहे. केवळ उपदेश करण्यापेक्षा या मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी आपणच प्रयत्न करू असा निश्चय डॉ. स्मिता डोळे यांनी केला.

त्या नुसार गुढी पाडव्याच्या महूर्तावर (ता. १३) डॉ. स्मिता डोळे त्यांचे पती डॉ. संदीप डोळे, सासरे डॉ. मनोहर डोळे हे मंगळवार (ता. १३) शेतमजूरांच्या वसाहतीत गेले. गुढी पाडव्या निमित्त मुलांना जिलेबीचे वाटप केले.  मुलांना एकत्र करून डॉ. स्मिता डोळे यांनी पंचवीस मुलांच्या हातात पाटी ,पेन्सिल व हस्ताक्षर पुस्तिका दिली. डॉ. डोळे यांनी मुलांना हस्ताक्षराचे धडे दिले. हस्ताक्षराची सुरवात मुलांनी पाटीवर श्री हे अक्षर गिरवून केली. पाटी, पेन्सिल, हस्ताक्षर पुस्तिका व त्या सोबत गोड खाऊ मिळाल्याने या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. या उपक्रमातून डॉ. डोळे यांनी नवा भारतदेश घडवण्यासाठी भारतीय नववर्षाची सुरुवात सेवेतून ज्ञान दानाची गुढी  उभारूण करू असा संदेश दिला.

दारिद्र्याची साक्ष देणाऱ्या मळकटलेल्या कपड्यातील या मुलांच्या लुकलुकणाऱ्या डोळ्यात मला प्रचंड उत्साह  दिसला. शिक्षणाची संधी मिळाल्यास उद्याचा भारत घडवण्याची क्षमता या मुलांमध्ये दिसली. या मुलांना हस्ताक्षराचे धडे देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. इतरांनी सुद्धा या उपक्रमात सहभागी व्हावे. -डॉ. स्मिता संदीप डोळे ( डॉ. मनोहर मेडिकल फाउंडेशन, नारायणगाव) 

(संपादन : सागर डी. शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com