पुण्यात ठेकेदाराकडून करणार सक्‍तीने वसुली 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019

राजकीय नेत्यांकडून दबाव वाढवून तब्बल 46 लाख रुपयांची थकबाकी भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या (कै.) सतीशशेठ मिसाळ वाहनतळाच्या ठेकेदाराकडून आता सक्तीने वसुली करण्यात येणार आहे.

पुणे - राजकीय नेत्यांकडून दबाव वाढवून तब्बल 46 लाख रुपयांची थकबाकी भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या (कै.) सतीशशेठ मिसाळ वाहनतळाच्या ठेकेदाराकडून आता सक्तीने वसुली करण्यात येणार आहे. त्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ठेकेदाराला नोटीस बजावून पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाने गुरुवारी सांगितले. महापालिकेच्या जागेचा वापर करून भाडे न भरणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी महापालिकेने ही पावले उचलली आहेत. 

वाहनचालकांच्या सोयीसाठी शहरात महापालिकेने 23 ठिकाणी वाहनतळ उभारले असून, त्यासाठी ठेकेदाराची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, गेल्या काही काळात ठेकेदार महिन्याकाठचे भाडे नियमित भरत नसल्याचे उघड झाले आहेत. त्यामुळे थकबाकी वाढली असून, ती भरण्याची नोटीस आल्यानंतर राजकीय दबाव आणला जात असल्याची उदाहरणे आहेत. त्यातूनच मिसाळ वाहनतळाच्या ठेकेदाराने थकबाकी सवलत मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, महापालिकेचे उपायुक्त राजेंद्र मुठे यांनी वाहनतळाला टाळे ठोकून थकबाकी तातडीने भरण्याची तंबी दिली होती. त्यानंतरही ठेकेदार पैसे देत नसल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले. त्यामुळे वाहनतळ ताब्यात घेऊन तो सुरू केला. 

वाहनतळांच्या नियमात बदल करणार 
महापालिकेच्या वाहनतळांमध्ये चारचाकी आणि दुचाकींना आकारण्यात येणारे शुल्क, ठेकेदाराकडील थकबाकी तपासण्यात येत आहे. त्यासाठी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी काही वाहनतळांना भेट देऊन पाहणी केली असून, वाहनचालकांच्या अडचणी जाणून घेतल्या आहेत. त्यानंतर आता वाहनतळांच्या नियमात काही बदल करण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले. 

23 - महापालिकेचे शहरातील वाहनतळ 
1500 - वाहनांची मिसाळ वाहनतळात सोय 
45  - दिवस वाहनतळ होता बंद 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: District collector notice to contractor for recovery