जिल्हा रुग्णालयात ‘केस पेपर’चा दुष्काळ

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 डिसेंबर 2016

पुणे - औंध येथील जिल्हा रुग्णालयामध्ये आलेल्या रुग्णाला देण्यासाठी एकही ‘केस पेपर’ आता शोधून सापडत नाही. केस पेपरच्या या दुष्काळामुळे बाह्य रुग्ण विभागातील रुग्णांना अक्षरशः कोऱ्या कागदावर रोगनिदान आणि औषधे दिली जात असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

पुणे - औंध येथील जिल्हा रुग्णालयामध्ये आलेल्या रुग्णाला देण्यासाठी एकही ‘केस पेपर’ आता शोधून सापडत नाही. केस पेपरच्या या दुष्काळामुळे बाह्य रुग्ण विभागातील रुग्णांना अक्षरशः कोऱ्या कागदावर रोगनिदान आणि औषधे दिली जात असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

रुग्णाला तपासून केलेले रोगनिदान, त्या आजारावर दिलेली औषधे, वेगवेगळ्या वैद्यकीय चाचण्यांचा दिलेला सल्ला याची सविस्तर नोंद डॉक्‍टर्स केस पेपरवर करत असतात. जिल्हा रुग्णालयातील हे केस पेपर आता पूर्णपणे संपले आहेत. गठ्ठ्यातून शोधून काढत एकेका रुग्णाला केस पेपर दिले जात होते. पण गठ्ठे शोधूनही आता केस पेपर सापडत नाहीत. ही बाब वारंवार वरिष्ठांच्या लक्षात आणून दिली. पण कोणतीच ठोस पावले उचलली गेली नाहीत, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातील सूत्रांनी दिली.

केस पेपर नव्याने मिळविण्याऐवजी रुग्णाच्या आजाराच्या, औषधाच्या नोंदी कोऱ्या कागदावर करण्याचा धडाका रुग्णालय प्रशासनाने सुरू केल्याचे शनिवारी उघडकीस आले. येरवडा कारागृहातील मुद्रणालयातून केस पेपरचा पुरवठा होतो. गेल्या काही दिवसांपासून हा पुरवठाच झाला नाही. मात्र त्यासाठी मुद्रणालयाकडे पाठपुरावा करण्यात आला नसल्याची माहितीही येथून मिळाली.

मुद्रणालयातून होणारा केस पेपरचा पुरवठा अद्याप झालेला नाही. महाराष्ट्रातील बऱ्याच सरकारी रुग्णालयांमध्ये केस पेपर मिळत नाहीत. त्यामुळे कोऱ्या कागदाचा वापर करावा लागतो. केस पेपर मिळावे यासाठी कर्मचाऱ्यांना मुद्रणालयात पाठविले आहे.
- डॉ. सी. एस. शेळके, जिल्हा शल्यचिकित्सक

छपाई तातडीने हवी असल्यास आम्ही प्राधान्याने ते काम पूर्ण करतो. रुग्णालयांमध्ये केस पेपर नसेल, तर रुग्णांची गैरसोय होत असते. रुग्णालय कर्मचाऱ्यांनी हे काम तातडीने पूर्ण करा, असे सांगणे आवश्‍यक होते.
- नरेश गोटे, व्यवस्थापक, येरवडा कारागृहातील मुद्रणालय

Web Title: District hospital in case paper of drought