पालिका कर्मचारी-फेरीवाल्यांमध्ये धक्काबुक्की

चिखली - पालिकेचे अतिक्रमणविरोधी पथक आणि फेरीवाल्यांमध्ये वाद झाल्यानंतर साने चौक पोलिस चौकीत फेरीवाल्यांनी गर्दी केली होती.
चिखली - पालिकेचे अतिक्रमणविरोधी पथक आणि फेरीवाल्यांमध्ये वाद झाल्यानंतर साने चौक पोलिस चौकीत फेरीवाल्यांनी गर्दी केली होती.

चिखली - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने रस्त्यावरील हातगाड्यांविरोधात कारवाई करीत असताना महापालिका कर्मचारी व फेरीवाले यांच्यात बाचाबाची होऊन धक्काबुक्की झाल्याची घटना घडली. दरम्यान, याबाबत महापालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने चिखली पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत तक्रार दाखल करण्याचे काम सुरू होते. चिखली-आकुर्डी रस्त्यावर कृष्णानगर येथे गुरुवारी (ता. ३१) सांयकाळी हा प्रकार घडला.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, चिखली रस्त्यावर थरमॅक्‍स चौक ते साने चौक या दरम्यान रस्त्यावर फळभाज्या विक्रेते आणि फेरीवाले गर्दी करतात. त्यामुळे या रस्त्यावर नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. नागरिकांच्या तक्रारीनंतर महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने गुरुवारी या रस्त्यावरील हातगाड्या आणि फेरीवाल्यांविरोधात कारवाई केली.

हातगाड्या उचलत असताना महापालिका कर्मचारी आणि फेरीवाल्यांमध्ये बाचाबाची झाली. परस्परविरोधात धक्काबुक्की झाल्याचे आरोप करण्यात आले. त्यानंतर महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकातील कर्मचाऱ्यांनी साने चौकी गाठून धक्काबुक्की केल्याची तक्रार दाखल केली. दरम्यान साने चौक पोलिस चौकीत फेरीवाल्यांनीही गर्दी केली होती.

अनधिकृत फेरीवाले रस्त्यावर गर्दी करतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन त्यांचा नागरिकांना त्रास होतो. अनेक जण फेरीवाला परवाना असल्याचेही सांगतात. मात्र, परवाना एकीकडचा आणि व्यवसाय दुसरीकडे करतात. हे अयोग्य असून, नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येत आहे. मात्र, फेरीवाले अनेक वेळा महापालिका कर्मचाऱ्यांबरोबर हुज्जत घालतात. गाड्या उचलल्यास कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून जातात. तसाच प्रकार गुरुवारी कृष्णानगर येथे झाला. याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
- राजेंद्र राणे, कार्यकारी अभियंता महापालिका 

फेरीवाल्यांची दररोज जगण्याची लढाई सुरू आहे. परवाना असताना कारवाई करणे अयोग्य आहे. महापालिकेने फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यासाठी जागा ठरवून द्यावी. तसा केंद्राचा कायदा आहे.
- काशिनाथ नखाते, अध्यक्ष, कष्टकरी महासंघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com