दिवे घाटात दरडींचा राडारोडा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 नोव्हेंबर 2016

फुरसुंगी - सासवड रस्त्यावरील दिवे घाटात पावसाळ्यात दरडी कोसळून पडलेला राडारोडा अद्यापही काही ठिकाणी पडून आहे. हा राडारोडा सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने हटवण्याची मागणी नागरिक, वाहनचालकांनी केली आहे. 

फुरसुंगी - सासवड रस्त्यावरील दिवे घाटात पावसाळ्यात दरडी कोसळून पडलेला राडारोडा अद्यापही काही ठिकाणी पडून आहे. हा राडारोडा सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने हटवण्याची मागणी नागरिक, वाहनचालकांनी केली आहे. 

हडपसर-सासवड रस्त्यावरील अवघड व तीव्र वळणांच्या दिवे घाटात डोंगरमाथ्याच्या अनेक ठिकाणच्या दरडी खिळखिळ्या झाल्या आहेत. त्यातील काही दरडी पावसाळ्यात कोसळल्या. यामुळे वाहतुकीस अडथळा येतो. घाट उतरताना दुसऱ्या व तिसऱ्या वळणावर खिळखिळ्या झालेल्या दरडींची संख्या मोठी आहे. त्यातील काही दरडी कोसळून राडारोडा रस्त्याकडेला आला आहे. येथून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना भितीचा सामना करावा लागत आहे. दरडींना जाळ्या लावणे व अन्य उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. आता पावसाळा संपला असल्याने संबंधित विभागाने राडारोडा हटवावा, आवश्‍यक दुरुस्त्या कराव्यात, अशी मागणी पुणे जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष जालिंदर कामठे, जिल्हा सरचिटणीस संदिप हरपळे, हवेली तालुका राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष राहुल चोरघडे, पुरंदर हवेली शिवसेनेचे अध्यक्ष संदीप मोडक, प्रवीण कामठे, राष्ट्रवादी ग्राहक संरक्षक समितीचे जिल्हा उपाध्यक्ष रवी पवार, संतोष भाडळे आदींनी केली आहे. 

सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता विलास ठुबे म्हणाले, की पावसाळा संपल्याने भेकराईनगर ते दिवे घाट या रस्त्याचे खड्डे भरणे, उड्डाण पुलाचे डांबरीकरण ही कामे हाती घेतली होती. ती संपल्याने आता तातडीने घाटातील उर्वरित दरडींचा राडारोडा दूर केला जाईल. त्यानंतर सासवड रस्ता व घाट रस्त्यात दुभाजक बसविणे, दरडी हटवणे, घाटातील महत्त्वाच्या दुरुस्त्या करणे ही कामे केली जातील.

Web Title: dive ghat landslide debris