#Divorce अवघ्या दहा दिवसांत घटस्फोट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

वाढत्या घटस्फोटांमुळे पती-पत्नीतील विश्‍वास व प्रेम कमी झाले आहे, असे वाटते का? याबाबत आपले मत आम्हाला ९१३००८८४५९ या मोबाईल क्रमांकावर what’s App करा किंवा webeditor@esakal.com वर मेल करा.

पुणे - घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्यानंतर कुवेतमध्ये राहणाऱ्या पत्नीला व पुण्यातील पतीला केवळ १० दिवसांत घटस्फोट देण्यात आला. एवढ्या कमी दिवसांत अर्ज निकाली निघण्याचे पुण्यातील हे पहिलेच प्रकरण असल्याचा दावा या प्रकरणातील महिलेच्या वकिलांनी केला आहे.

 कौटुंबिक न्यायालयातील न्यायाधीश सुभाष काफरे यांनी हा दावा निकाली काढला. तेहसीन आणि आसिफ (नावे बदलली आहेत) यांनी संमतीने घटस्फोट मिळण्यासाठी दावा दाखल केला होता. त्यांचे सप्टेंबर २०१३ मध्ये लग्न झाले होते. आसिफ हा पुण्यात नोकरी करतो, तर तेहसीन ही कुवेतमध्ये ४ वर्षांचा मुलगा व आई-वडिलांसोबत राहते. ती वर्षातून काही दिवस भारतात येते. ऑगस्ट २०१५ मध्ये मुलगा झाल्यानंतर ती केवळ १५ दिवस भारतात राहिली. त्यानंतर त्यांच्यात एकत्र येण्याच्या सर्व आशा संपल्या होत्या. दरम्यान, तिने आसिफ व त्याच्या 

नातेवाइकांनी शारीरिक व मानसिक छळ केल्याची नोटीस पाठवली. त्यामुळे वाद आणखी वाढल्याने त्या दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. 

तेहसीनला प्रत्येक तारखेस न्यायालयात हजर राहणे शक्‍य नव्हते. त्यामुळे त्यांनी ॲड. धीरज धोंगडे यांच्यामार्फत विशेष विवाह कायद्यानुसार संमतीने घटस्फोट घेण्यासाठी अर्ज दाखल केला. ॲड. धोंगडे यांनी संबंधित जोडप्याला ६ महिने थांबणे शक्‍य नसल्याचा युक्तिवाद केला. त्यामुळे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे तेहसीन साक्ष 

नोंदवून १० दिवसांत व एकाच तारखेत न्यायालयाने त्यांचा घटस्फोट मंजूर केला.

सहा महिन्यांचा कालावधी का असतो...
घटस्फोटाचा दावा निकाली काढण्यासाठी अर्ज केल्यापासून सहा महिने थांबण्याची तरतूद कायद्यात आहे. या कालावधीत त्यांच्यातील वाद मिटावा, असा उद्देश असतो. मात्र, ते पुन्हा एकत्र येण्याची शक्‍यता नसल्यास अपवादात्मक परिस्थितीत सहा महिन्यांचा कालावधी वगळण्यात येतो. 

वाढत्या घटस्फोटांमुळे पती-पत्नीतील विश्‍वास व प्रेम कमी झाले आहे, असे वाटते का? याबाबत आपले मत आम्हाला ९१३००८८४५९ या मोबाईल क्रमांकावर what’s App करा किंवा webeditor@esakal.com वर मेल करा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Divorce in just ten days