
Crime News : मूत्रपिंड विकार झालेल्या पत्नीला घटस्फोट
पुणे : पत्नीचे मूत्रपिंड निकामी होताच तिला वाऱ्यावर सोडलेल्या पतीची घटस्फोटाची मागणी कौटुंबिक न्यायालयाने मान्य केली. संबंधित महिलेला पित्याने मूत्रपिंड दान केले होते. तिच्यावर उपचार सुरू असताना पतीने घटस्फोटासाठी अर्ज केला. यानंतरही पत्नीने नांदण्यासाठी अर्ज केल्यावर पतीने कोणताही संपर्क साधला नाही ही या प्रकरणातील धक्कादायक बाब ठरली.
निकिता व नीलेश (नावे बदललेली आहेत) यांचे २०१५ मध्ये ‘अरेंज मॅरेज’ झाले. सुमारे तीन वर्षे त्यांचा संसार सुरळीत चालला. २०१८ मध्ये निकिताला अचानक उलट्यांचा त्रास होऊ लागला. वेगवेगळ्या चाचण्यांतून मूत्रपिंडाच्या विकाराचे निदान झाले.
पत्नीचे आजारपण लक्षात येताच नीलेशच्या वागण्यात बदल झाला. पत्नीची काळजी घेण्याऐवजी त्याने घटस्फोटाची मागणी सुरू केली. अखेर निकिता उपचाराकरिता माहेरी गेली. २०१९ मध्ये डॉक्टरांनी मूत्रपिंड प्रत्यारोपणाचा सल्ला दिला.
माहेरची आर्थिक परिस्थिती फार चांगली नसल्याने निकिताने शस्त्रक्रियेचा खर्च सरकारी योजना आणि काही सामाजिक संस्थांकडून जमा केला. निकितासाठी मूत्रपिंडदाता म्हणून वडील पुढे आले. शस्त्रक्रियेनंतर नीलेश तिला भेटायलाही आला नाही. त्याने घटस्फोटाची मागणी केल्यावर निकिताला धक्का बसला.
२०२२ मध्ये दाखल झालेल्या या प्रकरणात दोघेही पुन्हा एकत्र येऊन संसार करण्याची कोणतीही चिन्हे नव्हती. घटस्फोटासाठी सहा महिन्यांचा कालावधी आवश्यक नसल्याचे नमूद केल्याने न्यायालयाने १५ दिवसांत घटस्फोटाचा अर्ज मंजूर केला. कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश हितेश गणात्रा यांनी हा निकाल दिला.
पत्नीचा नांदण्यासाठीचा अर्ज
मूत्रपिंड प्रत्यारोपणानंतर नीलेश किंवा त्याच्या कुटुंबीयांपैकी कुणीही निकिताशी संपर्क साधला नाही. २०२२ मध्ये अॅड. अनघा काळे यांच्यामार्फत निकिताने नांदायला जाण्यासाठी तसेच पोटगीसाठी अर्ज दाखल केला. दोघांना न्यायालयीन मध्यस्थाकडे पाठविण्यात आले. त्या वेळी नीलेशने एकरकमी पोटगी देण्याचे कबूल केले. त्यामुळे सहमतीने घटस्फोट झाला.
फसवणुकीचे पुरावे नाहीत
नीलेशने आपली फसवणूक झाल्याचे घटस्फोटाच्या अर्जात नमुद केले; मात्र त्याने कोणतेही सबळ पुरावे दिले नाहीत.