‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे घटस्फोट

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 एप्रिल 2017

पुणे - घटस्फोटाच्या दाव्यातील पत्नी नोकरीसाठी लंडनला गेलेली... कंपनीबरोबर झालेल्या करारामुळे भारतात परत येण्यास अडचण... अशा वेळी न्यायालयाने ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’ची मदत घेत दाव्याची सुनावणी पूर्ण केली. सहमतीने घटस्फोट होत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर न्यायालयाने त्यास मान्यता दिली.

पुणे - घटस्फोटाच्या दाव्यातील पत्नी नोकरीसाठी लंडनला गेलेली... कंपनीबरोबर झालेल्या करारामुळे भारतात परत येण्यास अडचण... अशा वेळी न्यायालयाने ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’ची मदत घेत दाव्याची सुनावणी पूर्ण केली. सहमतीने घटस्फोट होत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर न्यायालयाने त्यास मान्यता दिली.

न्यायालयीन कामकाजात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा विषय नवीन नसला, तरी त्याची उपयुक्तता दिसून येते. वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश व्ही. एस. मलकापट्टे-रेड्डी यांच्यासमोर सुनावणी झालेल्या घटस्फोटाच्या दाव्यात ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’चा वापर करण्यात आला. या दाव्यातील जोडप्याचा विवाह मे २०१५ मध्ये झाला होता. दोघे पती-पत्नी उच्चशिक्षित होते. काही महिन्यांतच त्यांच्यात वाद सुरू झाला आणि एका वर्षाच्या आत विकोपाला पोचला. सप्टेंबर २०१६ मध्ये या दोघांनी सहमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार न्यायालयात दावा दाखल केला.

कायद्यातील तरतुदींनुसार न्यायालयाने सहा महिन्यांनंतर दाव्याची सुनावणी ठेवली. याचकालावधीत दाव्यातील पत्नीला लंडन येथे एका कंपनीत नोकरी मिळाली. एक वर्ष भारतात परत न नेण्याची अट तिला कंपनीने घातली होती. त्यामुळे प्रत्यक्षात तिला दाव्याच्या सुनावणीस हजर राहणे शक्‍य नव्हते. तिचे वकील ॲड. सूचित मुंदडा यांनी दाव्यातील सुनावणीसाठी ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’चा वापर करण्यासाठी न्यायालयाकडे अर्ज केला. न्यायालयाने हा अर्ज मान्य करत न्यायालयाने अर्जदार पत्नीची साक्ष ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे नोंदवून घेतली. तिचा पती सिंगापूर येथून सुनावणीसाठी न्यायालयात हजर होता. दोघांनाही सहमतीने घटस्फोट हवा होता. त्या दोघांनी पुण्यात एक सदनिका विकत घेतली होती. या सदनिकेसाठी पत्नीने दिलेले पैसे पतीने परत द्यावेत आणि ते घर पतीच्याच नावे राहील, या अटीवर न्यायालयाने घटस्फोटास मान्यता दिली. पतीतर्फे ॲड. शिल्पा सैनी यांनी बाजू मांडली.

Web Title: divorse on video conferance