उजळवू माणुसकीचे दीप!

संतोष शेणई
शनिवार, 29 ऑक्टोबर 2016

निसर्गाविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्याच्या किमान तीन हजार वर्षांपूर्वीच्या या परंपरेचे आजही तितक्‍याच उत्साहाने पालन करीत दिव्यांची उजळण होते. या उत्सवाला प्रत्येक काळात नावे निरनिराळी देण्यात आली. कोणी यक्षरात्री म्हटले, तर कोणी दीपमाला, तर कोणी दीपप्रतिपदुत्सव असे नाव दिले.

घरातलीच नव्हे; तर मना-मनातलीही जळमटे दूर करीत प्रकाश पसरवित येणाऱ्या दीपांचा महोत्सव सुरू झाला आहे. निसर्गाने पावसाळ्यात भरभरून दिलेल्या समृद्धीच्या आनंद उत्सवाचा, कृतज्ञतेचा सोहळाच सुरू झाला आहे.

निसर्गाविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्याच्या किमान तीन हजार वर्षांपूर्वीच्या या परंपरेचे आजही तितक्‍याच उत्साहाने पालन करीत दिव्यांची उजळण होते. या उत्सवाला प्रत्येक काळात नावे निरनिराळी देण्यात आली. कोणी यक्षरात्री म्हटले, तर कोणी दीपमाला, तर कोणी दीपप्रतिपदुत्सव असे नाव दिले. नात्याने बांधत जावे नाते, तसे दीपावर दीप उजळून दिव्यांची ओळ माणुसकीच्या अंगणात लावणारा हा उत्सव प्रत्येक काळात साजरा केला.

अंधाराला चिरून प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो. याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा, अशा शुभेच्छा परस्परांना देत या वर्षीही दीपोत्सव साजरा होतो आहे. सायंकाळी दारात रांगोळ्या काढून पणत्या लावल्या जात आहेत. शुक्रवारी धन्वंतरीपूजनानंतर सायंकाळी अनेक नद्यांचे घाट, जुन्या वाड्यांचे बुरूज, घरांची अंगणे, इमारती पणत्यांच्या, आकाशदीपांच्या प्रकाशात उजळून आले. आपला गतकाल अभिमानाने उजळण्याची ही प्रथा आजही त्याच मांगल्य भावनेने पाळली जाते आहे. दारात उंचावर लावलेल्या आकाशदीपांनी जणू आकाशीचे तारकामंडल आपल्या अंगणात आणण्याची किमया साधली आहे.

परीक्षांतून मोकळे झालेल्या मुलांची मातीचे किल्ले तयार करण्याची लगबग अजून सुरू असेल. किल्ले, त्यावर मातीची खेळणी आणि सर्जनाचं प्रतीक असलेल्या दीपोत्सवाशीच नातं सांगत उगवून येणारं हळीवाचं रान. ही परंपरा कशी व केव्हा सुरू झाली याची नोंद नाही; पण हा या उत्सवातील लहान मुलांच्या हौसेचा भाग आहे. सर्वांना हवीशी वाटणारी, नात्यांचे संबंध सांगणारी आणि जोपासणारी दिवाळी सुरू झाली याचा आनंद सगळ्याच चेहऱ्यांवर विलसताना दिसत आहे.

नरकचतुर्दशीच्या पहाटे अलक्ष्मीचे मर्दन केले जाईल. या निमित्ताने आपल्यातील नरकरूपी पापवासनांचा नायनाट व अहंकाराचे उच्चाटन केले जाईल. आत्म्यावरील अहंकाराचा पडदा दूर करून आत्मज्योत प्रकाशमान करण्याचा हा उत्सव आहे. दिवाळी म्हणजे दिव्यांचा लखलखाट, फराळाचा घमघमाट आणि फटाक्‍यांची आतषबाजी. या तीनही गोष्टींनी मनाला आपोआपच उभारी येते. यंदाच्या दिवाळीची सकारात्मक बाब म्हणजे कर्तव्याची जाणीव वाढताना दिसत आहे. घेणाऱ्यांचे हात कमी होत नसले तरी, देणाऱ्यांचे हात वाढत आहेत. वंचित आणि अभावग्रस्तांच्या, अत्याचारग्रस्त पीडितांच्या मदतीसाठी समाजातील तरुणवर्ग मोठ्या संख्येने पुढे येतो आहे. पर्यावरण रक्षणासाठीही सजगता निर्माण होत आहे. माणुसकीच्या दीपाने उजळलेली दिवाळी सुरू झाली आहे.

Web Title: Diwali celebration in maharashtra